नाशिकचे स्वामी, पुरी, गावडे यांना ‘आयएएस’पदी पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 07:54 PM2020-09-04T19:54:38+5:302020-09-04T19:56:14+5:30
या चारही अधिकाऱ्यांच्या महसुल खात्यातील कामकाज आणि विविध विभागांमधील कार्याचा अनुभव बघता सरकारकडून त्यांना आयएएसपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
नाशिक : विभागातील उपायुक्त असलेले दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, पुरवठा उपायुक्त प्रवीण पुरी, यांच्यासह शिर्डीचे मुख्यधिकारी कान्हुराज बगाटे यांना राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवापदी (आयएएस) पदोन्नती देण्यात आली आहे. राज्यातील एकूण २३ अपर जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
विभागीय महसुल कार्यालयातील उपायुक्त दिलीप स्वामी, यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, भुसंपादन अधिकारी या पदांवर दर्यापूर, अमरावती, पुसद, नांदेड, नाशिकला कामकाज पार पाडले आहे. सध्या विभागीय आयुक्तालयात ते कार्यरत आहेत. रघुनाथ गावडे हेदेखील विभागीय महसुल कार्यालयात उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांनी नाशिकच्या जिल्हा प्रशासनात महत्त्वाचे कामकाज पार पाडत सिंहस्थ कुंभमेळा कक्षाचे ते अपर जिल्हाधिकारी म्हणून होते. यावेळी त्यांनी विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने हरित कुंभमेळ्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा अनुभव बघता त्यांना आयएएसपदी बढती देण्यात आली आहे. शिर्डी येथील मुख्याधिकारी कान्हुराज बगाटे यांनाही बढती मिळाली आहे. बगाटे हे यापुर्वी नाशिकला अपर जिल्हाधिकारी पदावर होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत उपायुक्त, मुंबई-पुणे महामार्ग भुसंपादन अधिकारी, राज्य औद्योगिक विकास महामंडळ, विमानतळ विकास कंपनी, सरदार सरोवर, रत्नागिरी जिल्हा परिषदेत मुख्याधिकारी म्हणून त्यांनी कामकाज केले आहे. विभागीय आयुक्तालयात पुरवठा उपायुक्त पदाची सुत्रे सांभाळणारे पुरी यांनी यापुर्वी कोकण, ठाणे, नाशिक अशा विविध शहरांमध्ये काम केले आहे. त्यांनी प्रांतधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी पदावर यापुर्वी काम केले आहे. महसुल खात्याच्या जवळपास सर्वच विभागात त्यांनी आपल्या कार्यकाळात सेवा बजावली आहे.
या चारही अधिकाऱ्यांच्या महसुल खात्यातील कामकाज आणि विविध विभागांमधील कार्याचा अनुभव बघता सरकारकडून त्यांना आयएएसपदी पदोन्नती देण्यात आली आहे. विभागीय महसूल कार्यालयात कार्यरत तीघा अधिका-यांना बढती मिळाल्याने कार्यालयात आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.