स्वामी विवेकानंदांचे विचार कृतीत परावर्तित व्हावेत - कल्याणात्मानंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:39 AM2018-09-12T01:39:37+5:302018-09-12T01:40:25+5:30
स्वामी विवेकानंदांनी लोकांच्या कल्याणासाठी सर्व आयुष्य वेचले. स्वामी विवेकानंदांनी शंभर नचिकेत मिळावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. हे नचिकेत आभाळातून पडणार नसून तत्कालीन बांधवांमधूनच ते येणे अपेक्षित होते व आलेही. आज त्यांच्या भाषणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांचे कृतीत परिवर्तन करणारे अनुयायी तयार झाले पाहिजेत आणि त्यांनी देशकल्याणात मोठे योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबईच्या रामकृष्ण मठ मिशनचे स्वामी कल्याणात्मानंद यांनी केले.
नाशिक : स्वामी विवेकानंदांनी लोकांच्या कल्याणासाठी सर्व आयुष्य वेचले. स्वामी विवेकानंदांनी शंभर नचिकेत मिळावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. हे नचिकेत आभाळातून पडणार नसून तत्कालीन बांधवांमधूनच ते येणे अपेक्षित होते व आलेही. आज त्यांच्या भाषणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांचे कृतीत परिवर्तन करणारे अनुयायी तयार झाले पाहिजेत आणि त्यांनी देशकल्याणात मोठे योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबईच्या रामकृष्ण मठ मिशनचे स्वामी कल्याणात्मानंद यांनी केले. ते डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले, स्वामी विवेकानंद यांची आई धर्मप्रवण होती. ती विवेकानंदांना रामायण, महाभारत यांसारख्या प्रेरणादायी गोष्टी सांगत, त्यावर आधारित व्याख्यानांना घेऊन जात. त्यातून विवेकानंद घडत गेले. त्यांनी आयुष्यभर आपल्या पुस्तकांमधून, व्याख्यानांमधून देशहितावर भर दिला. संवेदनशील नागरिकांची फळी तयार केली. विवेकानंदांची ही शिकवण, कार्य आपण पुढे नेली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थिताना केले. रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, रामकृष्ण शारदाश्रम, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी व जिव्हाळा ग्रुप यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विश्ववंद्य स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्म परिषदेतील व्याख्यानास मंगळवारी (दि. ११) १२५ वर्षं पूर्ण झाले आहे. या क्रांतिकारी व्याख्यानाची स्मृती जागृत करण्यासाठी व स्वामीजींचा संदेश सर्वदूर पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी खुशाल पोद्दार, जयंत दीक्षित, शशिकांत पिसू, डॉ. डी. एम. पवार, अमोल अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब मगर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी परीक्षेतील यशाबद्दल तेजश्री जाधव, मधुरा घोलप, मंदार घुले या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत ‘सेवा समर्पण’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.