सिन्नरच्या भाजीबाजारात चिखलामुळे दलदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:31 PM2020-08-08T17:31:46+5:302020-08-08T17:32:10+5:30
सिन्नर : कोरोनाचे संकट सुरु झाले तेव्हापासून शहरभर पसरलेला भाजीबाजार आडव्या फाट्यावरील वंजारी संमाजाच्या मैदानावर आणण्यात आला. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मैदानावरील काळ्या मातीमुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य वाढले असून बाजारात पायी चालणे देखील अवघड बनले आहे.
सिन्नर : कोरोनाचे संकट सुरु झाले तेव्हापासून शहरभर पसरलेला भाजीबाजार आडव्या फाट्यावरील वंजारी संमाजाच्या मैदानावर आणण्यात आला. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मैदानावरील काळ्या मातीमुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य वाढले असून बाजारात पायी चालणे देखील अवघड बनले आहे.
कोरोनाचे संकटाने डोके वर काढले तेव्हा शहराच्या विविध भागात भाजीबाजार भरत होता. नवापूल, खासदार पूल ते गंगावेस, वावीवेस, गंगावेस, बसस्थानक ते वाजे विद्यालय या भागात भाजी विक्रेते बसायचे. मात्र, खरेदीसाठी ग्राहकांची होणारी गर्दी करोनाला निमंत्रण देणारी ठरु शकते हे लक्षात आल्याने शहरात सर्वत्र बसणारा भाजीबाजार एकाच ठिकाणी भरवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सुरुवातीला गोंदेश्वर मंदीराच्या परिसरात भाजीबाजार भरवण्याचा विचार नगर परिषदेने केला होता. मात्र, पुरातत्व विभागाच्या तांत्रिक अडचणींमूळे हा विचार मागे पडला. त्यानंतर सर्वांना सोयीचे ठरेल व सोशल डिस्टंन्सिंग पाळणे सोयीचे होईल अशी आडव्या फाट्यावरील वंजारी समाजाची प्रशस्त जागा भाजीबाजारासाठी निश्चित करण्यात आली. नगरपरिषदेने दुकानांसाठी जागा आखून दिल्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यापासून संपूर्ण भाजीबाजार या जागेत भरत आहे.
सध्या पावसाचे दिवस असून मैदानावरील काळ्या मातीमूळे संपूर्ण भाजीबाजारात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलामूळे पायी चालणे दखील अवघड झाले आहे. त्यातच भाजीपाला घेऊन येणारी वाहने थेट भाजीविक्रेते बसतात तेथे जात असल्याने चिखलाचे प्रमाण अजून वाढत आहे. अनेक ग्राहक स्वत:ची चारचाकी वाहने व दुचाकी घेऊन भाजी खरेदीसाठी जात असल्याने चिखल अजून वाढतो आहे. या चिखलातून रस्ता काढत भाजी विक्रेत्यापर्यंत पोहचणे ग्राहकांना अडचणीचे ठरत आहे. अनेकदा ही वाहने चिखल तुडवत जाताना ग्राहकांसह विक्रेत्यांवरही चिखल पाण्याचा मारा करत असतात. त्यामूळे अनेकदा ग्राहकांचे कपडे खराब होत आहेत. बाजारात दररोज शेकडो ग्राहक खरेदीसाठी येत असतात. त्यात महिलांची संख्या अधिक असते. त्याशिवाय तालुक्याच्या विविध भागातील शेतकरी, महिला भाजीपाला विकण्यासाठी दररोज बाजारात येत असतात. बाजारात असणारी चिखलाची ही परिस्थिती ग्राहक व विक्रेत्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची भिती व्यक्त होत आहे. चिखलामूळे डांसाचे प्रमाण वाढल्याचे तक्रार भाजी विक्रेत्यांकडून होत आहे. पाऊस आल्यास मैदानात पावसापासून बचाव व्हावा यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यात चिखलामूळे समस्यांमध्ये वाढ होत आहे. पावसामूळे थंडी वाढली असून बदललेल्या वातावरणाने सर्दीसारखे छोटे-मोठे आजार डोके वर काढू शकतात. त्यातून करोनाला आमंत्रण मिळू शकते.
नगर परिषदेने पुढाकार घेऊन भाजी बाजारातील चिखल कमी करण्यासाठी मुरुम टाकावा अशी मागणी भाजी विक्रेते, शेतकरी व ग्राहकांकडून करण्यात येत आहे.