स्वराज फाउंडेशनने उभारली ‘वॉल आॅफ लाइफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:44 AM2018-03-27T11:44:14+5:302018-03-27T11:44:14+5:30
जनजागृती : अवयवदानाचे महत्व अधोरेखीत करणारी चित्रे देताय संदेश
नाशिक : अवयवदान जनजागृतीसाठी येथील स्वराज फाउंडेशन, विलासराव देशमुख फाउंडेशन व रोटरी क्लब आॅफ नाशिक मेट्रो यांच्या वतीने ‘वॉल आॅफ लाइफ’ साकारण्यात आली आहे. बुधवारी (दि.२८) त्याचे उदघाटन होत आहे. एचपीटी महाविद्यालयासमोरील भिंतीवर अवयवदान जनजागृतीपर चित्रांचे रेखाटन असलेली ही वॉल तयार करण्यात आली असून, अर्चना मेटकर यांनी यासाठी समर्पक चित्रांचे संकलन केले आहे. मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो शहरांमध्ये विविध हॉस्पिटल्समध्ये ही संकल्पना राबविताना दिसतात. त्या धर्तीवर नाशकात हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. या संकल्पनेअंतर्गत भिंतीवर अवयवदानाची माहिती देणारी, त्याविषयी गैरसमज दूर करणारी चित्रे शहरातील चित्रकारांकडून रेखाटण्यात आली आहेत. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. स्वराज फाउंडेशनतर्फे दोन महिन्यांपासून अवयवदान मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेस नाशिकमधील सामाजिक, शैक्षणिक, महिला संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.