‘स्वररंग’ संगीत मैफल खुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:46 AM2017-08-19T00:46:51+5:302017-08-19T00:47:14+5:30
पुणे येथील गायक सुधाकर चव्हाण यांनी सादर केलेली ‘अब तो रूत मान’ ही बडा ख्यालातील, तर ‘बित गये जुगवा’ ही द्रुत बंदीश तसेच तेजश्री पिटके यांनी राग जोगकंसमधील ‘सुघर वर पायो’ ही बडा ख्यालातील बंदिश सादर करत उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित आणि संवादी प्रस्तुत ‘स्वररंग’ या संगीत मैफलीचे.
नाशिक : पुणे येथील गायक सुधाकर चव्हाण यांनी सादर केलेली ‘अब तो रूत मान’ ही बडा ख्यालातील, तर ‘बित गये जुगवा’ ही द्रुत बंदीश तसेच तेजश्री पिटके यांनी राग जोगकंसमधील ‘सुघर वर पायो’ ही बडा ख्यालातील बंदिश सादर करत उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित आणि संवादी प्रस्तुत ‘स्वररंग’ या संगीत मैफलीचे.
कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृहात ‘स्वररंग’ या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत मैफलीत सुधाकर चव्हाण यांनी ‘अवघा रंग एकची झाला’ या भजनाचेदेखील सादरीकरण केले. तेजश्री पिटके यांनी ‘पीर पराई’ ही द्रुत बंदीश, ‘किवडीया खोलो’ ही ठुमरी, तर ‘बोलावा विठ्ठल’ या अभंगाचे सादरीकरण करत ही मैफल अधिकच खुलवली.
या संगीत मैफलीत सागर कुलकर्णी (संवादिनी), हनुमंत फडतरे (तबला), केतन इनामदार (तानपुरा) यांनी साथसंगत तर संदीप गुरव यांनी गायन साथ केली. या संगीत मैफलीचे प्रास्ताविक कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, तर स्वागत वास्तुविशारद जयेंद्र पाबारी यांनी केले. या मैफलीस संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.