रविवारी रंगणार ‘स्वरभास्कर १००’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:27 AM2021-03-13T04:27:16+5:302021-03-13T04:27:16+5:30
नाशिक : हिंदुस्थानी शास्रीय गायन क्षेत्रातील दिग्गज पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कालातीत स्वरांचा उत्सव नाशिकच्या कालिदास ...
नाशिक : हिंदुस्थानी शास्रीय गायन क्षेत्रातील दिग्गज पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कालातीत स्वरांचा उत्सव नाशिकच्या कालिदास कलामंदिरात रविवारी (दि. १४) रंगणार आहे. ४ फेब्रुवारीच्या पंडितजींच्या जन्मतारखेच्या एक दिवस आधीपासून ‘स्वरभास्कर १००’ने प्रारंभ झाला असून, त्यातील दुसऱ्या पुष्पात किराणा घराण्याचे प्रख्यात शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी आणि अमेरिकन बासरीवादक नॅश नॉबर यांचे सादरीकरण होणार असल्याची माहिती आयोजक आणि पंचम निषाद संस्थेचे प्रमुख शशी व्यास यांनी पत्रकार परिषदेत दिली. रित्विक फाउण्डेशनच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम कालिदास कलामंदिरात रविवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सात दशकांच्या कारकिर्दीत देश-विदेशातील संगीतप्रेमींच्या कित्येक पिढ्यांना मुग्ध केले आहे. संगीतातील या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने भारतीय शास्त्रीय संगीताला पुनरुज्जीवित करण्यात, नवी ओळख निर्माण करण्यास चालना दिल्याचे व्यास यांनी नमूद केले. या ‘स्वरभास्कर १००’ कार्यक्रमाची शृंखला भारतातील वेगवेगळ्या सहा शहरांमध्ये फेब्रुवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात सादर होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वरभास्कर १०० मध्ये या दोन ख्यातनाम शास्त्रीय कलाकारांकडून पंडित भीमसेन जोशी यांना बहारदार आणि समृद्ध अशी आदरांजली वाहिली जाणार आहे. नाशिकमधील चोखंदळ संगीतप्रेमींना भीमसेन जोशी यांच्या लोकप्रिय आणि मधुर रचनांचा पुन्हा नव्याने आस्वाद घेता येणार असल्याचे व्यास यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत फ्रेंड्स सर्कलचे जयप्रकाश जातेगावकर उपस्थित होते.
इन्फो
लाभला पंडितजींचा आशीर्वाद
जयतीर्थ मेवुंडी यांनी बालपणापासूनच माझ्या गायनावर पंडितजींची छाप असून, ते हुबळीला आले असताना माझ्या बालपणीच त्यांनी माझ्या गळ्याला हात लावून आणि डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला असल्याची आठवण सांगितली. पुण्यातील सवाई गंधर्वमहोत्सवात पंडितजींनीच मला तंबोरा लावून दिला हा माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद होता, असेही त्यांनी नमूद केले, तर प्रथमच गाताना पंडितजींसमोर माझी झालेली बिकट अवस्था पाहून त्यांनी मला धीर दिल्याची आठवणदेखील मेवुंडी यांनी सांगितली.
इन्फो
अमेरिकन बासरीवादक नॅश नॉबर यांनी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे मी सहा वर्ष प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले. तसेच पंडित भीमसेन जोशी यांचे दर्शन किमान काहीवेळा तरी घडल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजत असल्याचे सांगितले. शास्त्रीय संगीत म्हणजे जुने नव्हे तर कालातीत अर्थात टाइमलेस आहे. तसेच भारतीय आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीताची थिअरी आणि ॲप्रोच परस्परविरोधी असले तरी त्यांच्या परिणामात खूप साम्य असल्याचेही नॉबर यांनी नमूद केले.