देवगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:18 AM2021-08-27T04:18:18+5:302021-08-27T04:18:18+5:30
त्र्यंबकेश्वर/ देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून, गेल्या तीन ते चार दिवसांपासून श्रीघाट शिवारात ...
त्र्यंबकेश्वर/ देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून, गेल्या तीन ते चार दिवसांपासून श्रीघाट शिवारात भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्या थेट गावात येत आहे. गेल्या काही दिवसांत दोन शेळ्या, एक बोकड, कोंबडे आणि एका पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून बिबट्याने फस्त केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर देवगाव परिसरातील वावीहर्ष ( बांगरवाडी), तोरणवाडी आणि श्रीघाट या ठिकाणी होत असून, भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्याने वेगवेगळ्या ठिकाणी संचार करून शिकार केली आहे. तोरणवाडी येथील पशुपालक बाबू कामडी यांची शेळी बिबट्याने फस्त केली. तसेच एक-दोन दिवसांच्या अंतराने मंजुळाबाई कौले यांच्या दोन शेळ्यांवर हल्ला चढवून ठार केल्या. त्यामुळे गावातील नागरिक बिबट्याच्या दहशतीच्या वातावरणात वावरत असून, वनविभागाकडून तत्काळ कार्यवाही करून पिंजरा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
श्रीघाट परिसरात वनविभागाचे राखीव परिक्षेत्र जंगल आहे. तसेच मालकी क्षेत्राचेही जंगल असल्यामुळे घनदाट जंगल परिसरामुळे या भागात बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणावर असतो. दि. २४ ऑगस्ट रोजी अनंता हरी कौले यांच्या बोकडावर बिबट्याने हल्ला करून फस्त केले. याबाबत वनविभागाकडे तक्रार केली असता वन परिमंडल अधिकारी बाळकृष्ण सोनवणे व वनरक्षक सुरेखा आव्हाड यांनी पंचनामा करून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
-----------------
...बिबट्याच्या बंदोबस्त केव्हा?
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. मात्र, अद्यापही बिबट्याचा बंदोबस्त झाला नसल्याने नागरिक बिबट्याच्या दहशतखाली आहेत. धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचा बंदोबस्त कधी होणार, असा सवाल महिला, आबालवृद्ध तसेच शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
-------------------------
नागरिकांनी आपापल्या पशुधनासोबत आपली खबरदारी घ्यावी. येत्या एक ते दोन दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल.
- बाळकृष्ण सोनवणे, वन परिमंडल अधिकारी, देवगाव
--------------------
जंगलात गुरांना चारत असताना अचानक बिबट्याने वासरावर हल्ला केला. या हल्ल्याने मीसुद्धा भयभीत झालो. मात्र, दगड, काठीच्या साहाय्याने बिबट्याला पळवून लावले.
- विनोद कौले, पशुपालक, श्रीघाट