शपथ घेताच शासकीय संकेतस्थळावर फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 01:04 AM2019-11-25T01:04:17+5:302019-11-25T01:04:38+5:30
शनिवारी सकाळी घडलेल्या अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि लागलीच महाराष्टÑ शासनाच्या संकेतस्थळावर मुख्यमंत्री म्हणून त्यांचे छायाचित्रही झळकले.
नाशिक : शनिवारी सकाळी घडलेल्या अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि लागलीच महाराष्टÑ शासनाच्या संकेतस्थळावर मुख्यमंत्री म्हणून त्यांचे छायाचित्रही झळकले. निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेसंदर्भातील पेच निर्माण झाल्याने महाराष्टत राष्टपती राजवट लागू होती त्यामुळे संकेतस्थळावर केवळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेच छायाचित्र होते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन करण्यासंदर्भात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडीनंतरही सत्तास्थापनेसंदर्भातील सस्पेन्स कायम होता. राज्यपालांनी दिलेल्या वेळेत भाजपाने सत्ता स्थापन करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर आणि अन्य पक्षांनीही दावा केला नसल्याने गेल्या १२ तारखेपासून महाराष्टÑात राष्टÑपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यामुळे साहजिकच महाराष्टÑ शासनाच्या संकेतस्थळावर राज्यपाल कोश्यारी यांचेच छायचित्र होते.
राष्टÑपती राजवट सुरू असतानाच दुसरीकडे सत्तास्थापनेतील वाटाघाटींनाही वेग आला होता. शिवसेना आणि राष्टÑवादीकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली असतानाच अजित पवारांनी काही आमदारांसह भाजपाशी हातमिळवणी केली आणि शनिवारी सकाळी फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर शनिवारी दुपारनंतर संकेतस्थळावर त्यांचे छायाचित्रही झळकल्याचे सांगण्यात आले. रविवारी या संदर्भातील खात्री केली असता संकेतस्थळावर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र दिसून आले.
उपमुख्यमंत्र्यांचे मात्र छायाचित्र नाही
फडणवीस यांनी शनिवारी शपथ घेतल्यानंतर महाराष्टÑ शासनाच्या संकेतस्थळावर लागलीच त्यांचे छायाचित्र झळकले असले तरी उपमुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण करणारे अजित पवार यांचे छायचित्र मात्र संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेले नव्हते. दोघांनी एकदाच शपथ घेऊनही उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र नसल्याने अनेकांनी त्याचा राजकीय आणि कायदेशीर अडचणीचा भाग म्हणून पवार यांचा उल्लेख केला नसावा अशी चर्चा सुरू होती.