सफाई कामगारांची भुजबळांच्या निवासस्थानी धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 04:47 PM2020-06-12T16:47:52+5:302020-06-12T16:47:52+5:30
नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मनपा आयुक्त यांना हाताशी धरून सुमारे ७०० सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रक्रिया निविदा राबविण्यास सुरुवात केली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मनपा आयुक्त यांना हाताशी धरून सुमारे ७०० सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रक्रिया निविदा राबविण्यास सुरुवात केली असून, ही भरती तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी धाव घेऊन धडक दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मागासवर्ग विभागाचे प्रदेश चिटणीस सुरेश दलोड व कॉँग्रेसचे सरचिटणीस सुरेश मारू यांच्या नेतृत्वाखाली सफाई कर्मचा-यांनी एकत्र येत पालकमंत्री भुजबळ यांची निवासस्थानी भेट घेत महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा निषेध नोंदविला व निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की,भाजपने मनपा आयुक्त यांना हाताशी धरून ७०० सफाई कर्मचा-यांची भरतीसाठी निविदाप्रक्रिया राबविली आहे. यामध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाला असून, शासनस्तरावरून ही निविदा तत्काळ रद्द करावी व भाजपच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. कोरोनाची महामारी असतानाही सफाई कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता कर्मचारी काम करीत आहेत. भाजप सत्तेच्या दबावाने भरतीसाठी घाईघाईने निविदा काढत त्याची अंमलबजावणी करीत आहे. महापालिकेकडे पैसा आहे. परंतु केंद्र व राज्य शासनाच्या भंगीमुक्ती पुनर्वसनाची अंमलबजावणी करण्यासाठी पैसे नसल्याचा आव आणित असल्याचा आरोपही यावेळी दलोड व मारू यांनी केला आहे. महापालिकेच्या या धोरणाविरुद्ध येत्या १५ जून रोजी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने समांतर अंतर पाळत मनपा मुख्यालयावर तीव्र निदर्शने करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी शेकडो सफाई कर्मचारी उपस्थित होते.