उन्हामुळे मुके प्राणी बेहाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:14 PM2018-05-14T15:14:58+5:302018-05-14T15:14:58+5:30
सिन्नर : तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने तालुक्यातील गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. उन्हात पशूधनांना फटका बसत असून या उन्हामुळे मुके प्राणी बेहाल झाले आहेत.
सिन्नर : तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असल्याने तालुक्यातील गुरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका वाढला आहे. उन्हात पशूधनांना फटका बसत असून या उन्हामुळे मुके प्राणी बेहाल झाले आहेत. त्यामुळे उन्हाळी आजारांपासून जनावरांना वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. मे महिना उजाडल्यापासून तालुक्याचे तपमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सध्या तालुक्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून मानव विविध मार्गांनी आपला बचाव करुन घेवू शकतात. मात्र जनावरांना या कडक उन्हाचा फटका बसत आहे. तालुक्यातील ३० टक्के गुरे ही प्रजननक्षम असल्याने त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे तालुक्यातील जनावरांची रानात भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची व ओल्या चाऱ्याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे. वाढत असलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. तालुक्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने जनावरांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरिराचे तापमान १०३ ते १०७ अंशापर्यंत वाढते. यामुळे श्वसनाचा वेग, हृदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्त्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, जनावरांचा तोल जावून ते खाली कोसळणे, झटके येणे व जनावरे दगावल्याची भीती वाढली आहे. चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा चटका बसत असून वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांची पशुधन विभागाकडून लसीकरण व पशुपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.
----------------
समर फिवरचा धोका वाढला
उन्हाच्या या तीव्रतेमुळे जनावरांची प्रजनन क्षमता कमी होणे, वजन घटणे, अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील तपमान वाढल्यामुळे जनावरांना समर फिवरचा धोका वाढला आहे. समर फिवरपासून जनावराांची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.
--------------
मोकाट जनावरे आजारांचे बळी
चारा व पाणीटंचाईमुळे अनेक पशूपालक आपली जनावरे मोकाट सोडत आहेत. शहरी भागातही असे अनेक जनावरे मोकाट फिरतांना दिसतात. या जनावरांना वेळेवर चारा व पाणी मिळत नसल्याने मोकाट जनावरे विविध आजारांचे बळी पडत आहे. चारा व पाण्याच्या शोधात फिरणाºया जनावरांना ऊन लागुन झटके येणे व जनावरांचा तोल जावून जनावर जमिनीवर कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.