दप्तरमुक्त शाळेत बाप्पांच्या प्रसादाचा गोडवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:16 PM2019-09-10T23:16:11+5:302019-09-10T23:16:37+5:30
सिन्नर : दप्तरमुक्त शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा आनंदाचा दिवस. तालुक्यातील देवपूर हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिभेवर या आनंदाच्या दिवशी लाडूचा गोडवा पसरल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
सिन्नर : दप्तरमुक्त शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा आनंदाचा दिवस. तालुक्यातील देवपूर हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिभेवर या आनंदाच्या दिवशी लाडूचा गोडवा पसरल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. या गणेशोत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांना बाप्पाचा प्रसाद म्हणून शिक्षकांकडून नेहमी वैशिष्ट्यपूर्ण मेजवानी दिली जाते. कधी जेवण तर कधी पोटभर मोदकांचा प्रसाद दिला जातो. यावर्षी मात्र विद्यार्थ्यांना बुंदीच्या लाडूचा प्रसाद देण्याचे ठरले.
शनिवारी दप्तरमुक्त शाळा राहत असल्याने यादिवशी विद्यार्थी विविध उपक्रम राबवित असतात. त्यामुळे दररोजच्यापेक्षा विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अधिक आनंददायी असतो. या आनंदात अधिक गोडवा निर्माण करण्यासाठी माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी लाडूचा प्रसाद वाटप करण्याचे ठरवले. त्यानुसार गणपती आरतीनंतर तो माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही तो वाटण्यात आला. त्यामुळे दप्तरमुक्त शाळेच्या दिवशी बाप्पाच्या प्रसादाने विद्यार्थ्यांच्या जिभेवर गोडवा व मनात अपार आनंद दिसून आला. या उपक्रमासाठी प्रभारी मुख्याध्यापक आर. वाय. मोगल, सुमन मुंगसे, सुनील पगार, श्रीहरी सैंद्रे, विलास पाटील, वैशाली पाटील, एस.टी. गुरूळे, प्रमोद बधान, नानासाहेब खुळे, राजेश आहेर, दत्तात्रय आदिक, मीनानाथ जाधव, प्रा. सोपान गडाख, प्रा. रवींद्र गडाख, नारायण भालेराव, अशोक कळंबे, सतीश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.