‘कडू’ घटनेनंतर ‘गोड’ धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:30 AM2018-01-24T00:30:27+5:302018-01-24T00:30:56+5:30
बरोबर सहा महिन्यांपूर्वी २४ जुलै २०१७ रोजी नाशिक महापालिकेत आयुक्तांच्या दालनात अघटित घडले आणि अपंगांसाठी राखीव ३ टक्के निधीच्या खर्चाबाबत जाब विचारत प्रहार संघटनेचे संस्थापक व अपक्ष आमदार बच्चू कडू यांची थेट आयुक्तांवर हात उगारण्यापर्यंत मजल गेली. परंतु, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी आंदोलनाबद्दल द्वेषमूलक भावना मनात न ठेवता महापालिकेमार्फत गेल्या सहा महिन्यांत अपंग व्यक्तींसाठी अनेक प्रकल्पांना चालना देत ‘कडू’ घटनेनंतरही अपंगांना ‘गोड’ धक्के दिले. त्यामुळे, राज्यातील अन्य महापालिकाही आता नाशिक महापालिकेकडे अपंगांसाठी राबविण्यात येणाºया प्रकल्पांची माहिती घेऊ लागल्या आहेत.
नाशिक : बरोबर सहा महिन्यांपूर्वी २४ जुलै २०१७ रोजी नाशिक महापालिकेत आयुक्तांच्या दालनात अघटित घडले आणि अपंगांसाठी राखीव ३ टक्के निधीच्या खर्चाबाबत जाब विचारत प्रहार संघटनेचे संस्थापक व अपक्ष आमदार बच्चू कडू यांची थेट आयुक्तांवर हात उगारण्यापर्यंत मजल गेली. परंतु, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी आंदोलनाबद्दल द्वेषमूलक भावना मनात न ठेवता महापालिकेमार्फत गेल्या सहा महिन्यांत अपंग व्यक्तींसाठी अनेक प्रकल्पांना चालना देत ‘कडू’ घटनेनंतरही अपंगांना ‘गोड’ धक्के दिले. त्यामुळे, राज्यातील अन्य महापालिकाही आता नाशिक महापालिकेकडे अपंगांसाठी राबविण्यात येणाºया प्रकल्पांची माहिती घेऊ लागल्या आहेत. १९९५ च्या अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी खर्च होत नसल्याबद्दल सहा महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महापालिका गाठत आयुक्तांसह अधिकाºयांना जाब विचारला होता. परंतु, कडू यांच्या आंदोलनाच्या पद्धतीमुळे उभयतांचा संयम सुटला आणि प्रश्न सुटण्याऐवजी त्यांचा अधिक गुंता वाढण्याची स्थिती निर्माण झाली. कडू यांच्यावर रीतसर कायदेशीर गुन्हाही दाखल झाला. परंतु, गेल्या सहा महिन्यांत नाशिक महापालिकेने अपंगांच्या पुनर्वसनाबाबत हाताळलेली परिस्थिती राज्यातील अन्य महापालिकांच्या तुलनेत सरस आणि दिशादर्शक ठरली आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनाच्या प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकात २० कोटी रुपयांची तरतूद केली आणि प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांना समन्वयक नेमत विविध प्रकल्पांना चालना दिली गेली. फडोळ यांनी १८ कलमी कृती आराखडा तयार केला आणि आता एकेक कलमांचा निपटारा होऊ लागला आहे. सर्वप्रथम, महापालिकेने शहरातील दिव्यांग व्यक्तींचा सर्व्हे कार्यक्रम हाती घेतला. यापूर्वी २०१३ मध्ये महापालिकेने दिव्यांगांचा सर्व्हे केला असता त्यात ५०८ दिव्यांग आढळून आले होते. अपंग बांधवांसाठी नाशिक महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयात व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आल्या. अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावानुसार, महापालिकेच्या ज्या शाळा इमारतींमधील तळमजल्यावरील वर्गखोल्या रिक्त आहेत तेथे सदर शाळा सुरू करण्याचे प्रस्तावित असून, ती शाळा एखादी नामवंत संस्था अथवा एनजीओमार्फत चालविण्याचा विचार आहे. महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे आणि त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. दिव्यांगांना वैद्यकीय सेवा तत्काळ पोहोचावी यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने फिरता दवाखाना तयार केला असून, उपचाराची गरज भासणाºया दिव्यांगाने सदर दवाखान्यातील कर्मचाºयाला दिलेल्या मोबाइलवर संपर्क साधल्यास तत्काळ फिरता दवाखाना संबंधिताकडे दाखल होणार आहे. अपंग बांधवांसाठी विम्याचेही कवच असणार आहे आणि वैद्यकीय विमा काढण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे.
...या प्रकल्पांवर सुरू आहे कार्यवाही !
शिक्षण विभागाने अपंग लाभार्थी निश्चित करून खेळाडूंना शिष्यवृत्ती वाटप करणे, उत्पन्नाच्या अटीवर घरकुलांसाठी अर्थसहाय्य देणे, अपंगांच्या मागणीनुसार त्यांना उदरनिर्वाहासाठी, व्यवसाय अथवा साहित्य खरेदीसाठी निधी त्यांच्या बॅँक खात्यात जमा करणे, अपंग बांधवांचा मेडिक्लेम काढणे, अंध-अपंगांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करणे, अपंग व्यक्तींना मोठ्या आजारासाठी अर्थसहाय्य करणे, अपंगांना राखीव ठेवण्यात आलेल्या गाळ्यांपैकी शिल्लक पाच गाळ्यांचे वाटप करणे, महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालय क्षेत्रात वाचनालये, ग्रंथालय तयार करणे, मनपा शाळांमध्ये अपंग संसाधन कक्ष स्थापन करणे, अपंगांसाठी क्रीडा, चित्रकला, हस्तकला आदी स्पर्धा घेणे, पॅरॉआॅलिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी प्रशिक्षण खर्च देणे, मनपाच्या सहाही विभागीय कार्यालय क्षेत्रात प्रत्येकी एक व्यायामशाळा उभारणे, २० अपंग बचत गटांना अर्थसहाय्य करणे, लाभार्थ्यांना संसारोपयोगी साहित्य पुरवणे, सहाही विभागात विकलांग भवनची उभारणी करणे आदी सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत.