गंगापूररोडवर आकाशवाणी केंद्राजवळील मोकळ्या जागेत तरण तलावच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 01:02 AM2018-10-17T01:02:12+5:302018-10-17T01:04:32+5:30
गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील मोकळ्या जागेत शासनाच्या वतीने जलतरण तलाव मंजूर केला असून, महापालिकेच्या आयुक्तांनी त्यास संमती देतानाच प्रशासनाने त्यांचे संकल्पचित्रदेखील तयार करून दिले आहे. त्यामुळे त्याठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा प्रश्नच नाही, असे सांगत भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी नियोजित जागी तरण तलावच होईल क्रीडा संकुल नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.
नाशिक : गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील मोकळ्या जागेत शासनाच्या वतीने जलतरण तलाव मंजूर केला असून, महापालिकेच्या आयुक्तांनी त्यास संमती देतानाच प्रशासनाने त्यांचे संकल्पचित्रदेखील तयार करून दिले आहे. त्यामुळे त्याठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा प्रश्नच नाही, असे सांगत भाजपा आमदारदेवयानी फरांदे यांनी नियोजित जागी तरण तलावच होईल क्रीडा संकुल नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. महापालिकेतील संघर्षात आयुक्त तुकाराम मुंढे यांची बाजू लावून धरणाऱ्या फरांदे यांनी प्रथमच आयुक्त मुंढे यांच्या संदर्भात अशी भूमिका घेतली असून, त्यामुळे आता मुंढे काय भूमिका घेतात याकडे शहराचे लक्ष लागून आहे.
आकाशवाणी केंद्राजवळ शासनाच्या विशेष निधीतून जलतरण तलाव बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रसिध्द केल्या आहेत. तथापि, गेल्या शनिवारी (दि.६) आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम आकाशवाणी केंद्राजवळ झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्राजवळील मैदानाच्या जागेत जलतरण तलाव नव्हे तर क्रीडा संकुल होईल, असे सांगितले. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आमदार फरांदे यांना मोठा दणका दिल्याची चर्चा होत होती.
या संदर्भात आमदार फरांदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आयुक्त मुंढे यांनी यासंदर्भात यापूर्वी झालेल्या कागदपत्रांची माहिती घेऊन मगच भूमिका घेतली पाहिजे. राज्य शासनाने जलतरण तलावासाठी मंजूर केल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी १३ डिसेंबर २०१६ रोजी महापालिकेकडून तांत्रिक मंजुरीसह अंदाजपत्रक मागितले होते. त्यानुसार महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये आपल्या पॅनलवरील वास्तुविशारद कारखानीस अॅँड असोसिएटच्या वतीने अंदाजपत्रक तयार करून संकल्पना चित्रदेखील तयार करून दिले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने ३ एप्रिल २०१७ रोजी निविदाप्रक्रिया राबविण्यापूर्वी जागेवरील बांधकाम अनुज्ञेय आहे किंवा नाही याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पत्र दिले. त्यावर २० एप्रिल २०१७ रोजी महापालिकेने सदर जागेचे नियोजन प्राधिकरण महापालिकाच असून मनपाच्या डीसीपीआरनुसार जलतरण तलावाचे बांधकाम अनुज्ञेय आहे, असे नमूद केले होते. त्यानुसारच १० आॅगस्ट २०१८ रोजी तरण तलावासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत, असा संपूर्ण फाईलींचा प्रवास कथन करून फरांदे यांनी सांगितले की, महापालिका आयुक्तांची भूमिका ही व्यक्तीसापेक्ष नसते तर पद म्हणून असते. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्णयात आता बदल कसा होऊ शकतो, असा प्रश्न त्यांनी केला.
लवकरच भूमिपूजन होणार
आकाशवाणी केंद्राजवळील नियोजित तरण तलावाच्या कामासाठी शासनाकडून दोन वर्षांपूर्वीच पाच कोटी रुपयांचा मंजूर निधी येऊन पडला आहे. आता त्या कामाला विरोध केल्यास नुकसान कोणाचे होणार असा प्रश्न करून फरांदे यांनी या कामाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार असल्याचेदेखील सांगितले. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी आमदार फरांदे यांनी चर्चा केली असता त्यांनी केंद्राजवळील जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात नसल्याचे सांगितले. तथापि, महापालिकेच्या ताब्यात जागा असून तसे प्रशासनाने लेखी दिल्याचे फरांदे यांनी सांगितले. ही जागा महापालिकेच्या ताब्यात असल्यानेच तेथे जॉगिंग ट्रॅक साकारण्यात आला असून, गेल्या रविवारी (दि.७) या ठिकाणी आमदार फरांदे यांनी राजस्थानी गरब्याचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल महापालिकेने १८ हजार रुपयांचे भाडे आकारल्याचे त्या म्हणाल्या.