जलतरण तलाव पूर्ववत सुरू
By Admin | Published: August 26, 2016 12:24 AM2016-08-26T00:24:25+5:302016-08-26T00:24:33+5:30
महापालिकेचा निर्णय : पंचवटीचा १ सप्टेंबरपासून खुला
नाशिक : महापालिकेने शहरात १५ आॅगस्टपासून पाणीकपात संपूर्णपणे रद्द करून दोन वेळ पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतानाच पालिकेचे चार जलतरणतलाव दोन सत्रात पूर्ववत सुरूकेले आहेत. पंचवटी येथील जलतरणतलावाचे काम मुंबईतील एजन्सीला देण्यात आले असून, १ सप्टेंबरपासून श्रीकांत ठाकरे तरण तलावही कार्यान्वित होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी दिली.
गंगापूर धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे महापालिकेने आपले पाचही जलतरणतलाव दि. २१ मार्च २०१६ पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेने नाशिक पश्चिम विभागातील वीर सावरकर तरणतलाव, नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरणतलाव, सिडकोतील स्वामी विवेकानंद तरणतलाव, सातपूर येथील क्लब हाउसमधील तरणतलाव आणि पंचवटीतील श्रीकांत ठाकरे तरणतलाव पूर्ण वेळ बंद ठेवले होते. महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासून शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली, त्याचवेळी मनपाच्या पाचही तरणतलावांतील सायंकाळचे सत्र बंद करण्यात आले होते. केवळ सकाळचे तीन सत्र चालविले जात होते. त्यानंतर २२ फेबु्रवारीपासून विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने दर सोमवारी साप्ताहिक सुटीसह दोन दिवस तरणतलाव बंद ठेवण्यात येत होते. मात्र, धरणातील पाणीसाठ्यात होत चाललेली घट लक्षात घेता पूर्णवेळ तरणतलाव बंद ठेवण्याच्या सूचना जलसंपदामंत्र्यांनी केल्या होत्या. दरम्यान, गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने महापौरांनी दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द करतानाच जलतरण तलावही खुले करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार, नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरणतलाव, सिडकोतील स्वामी विवेकानंद तरणतलाव, सातपूर येथील क्लब हाउसमधील तरणतलाव २ आॅगस्टपासून खुले करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)