कोरोना नंतर नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे संकट, जिल्ह्यात दहा बळी
By संजय पाठक | Published: August 31, 2022 12:28 PM2022-08-31T12:28:58+5:302022-08-31T12:29:07+5:30
नाशिक : कोरोना पाठोपाठ जिल्ह्यात आता पुन्हा स्वाईन फ्लूचे संकट वाढत असून जानेवारीपासून हळु हळू वाढत असलेल्या स्वाईन फ्ल्यूचा ...
नाशिक :
कोरोना पाठोपाठ जिल्ह्यात आता पुन्हा स्वाईन फ्लूचे संकट वाढत असून जानेवारीपासून हळु हळू वाढत असलेल्या स्वाईन फ्ल्यूचा ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक त्रास वाढला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत १३० रुग्ण आढळले आहेत. तर सोळा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहरातील सहा तर ग्रामीण भागात चार रुग्ण आढळले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने नागरीकांना अलर्ट दिला आहे.
ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या वाढल्याने नागरीकांमध्ये देखील चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे. कोरोना आणि स्वाईन फ्लूपासून बचावण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे, पौष्टिक आहार घ्यावा तसेच हस्तांदोलन टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये फ्लूसारखी लक्षणे असतील तर गर्दीत जाऊ नये असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या रोज कमी- जास्त होत असताना दुसरीकडे मात्र स्वाईन फ्लूने कहर केला आहे. गेल्या आठवड्यात स्वाईन फ्लूमुळे नाशिक शहरात तीन रुग्णांचा बळी गेला होता. आता ही संख्या सहावर पोहोचली आहे तर ग्रामीण भागात हीच संख्या चारवर गेली आहे. याशिवाय अहमदनगर जिल्ह्यात पाच बळी गेले असून पालघर जिल्ह्यात एक रुग्ण दगावला असल्याची माहिती नाशिक महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.