उत्सव काळात स्वाइन फ्लूचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:14 AM2017-08-26T00:14:34+5:302017-08-26T00:14:39+5:30

 Swine Flu risk during the celebration | उत्सव काळात स्वाइन फ्लूचा धोका

उत्सव काळात स्वाइन फ्लूचा धोका

Next

नाशिक : गौरी-गणपतीसह लागोपाठ आलेले सण, उत्सव साजरे करताना एकत्र जमणाºया गर्दीमुळे जंतुसंसर्गाची असणारी भीती, पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध साथीच्या आजारांची वाढती लागण या सर्व गोष्टी लक्षात घेऊन स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
स्वाइन फ्लूची लक्षणे जाणून घेऊन नागरिकांनी एकजरी लक्षण आढळल्यास तत्काळ सरकारी दवाखान्याला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. आरोग्य, विश्रांती, सकस आहार, सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी ही सारी पथ्ये सांभाळून स्वाइन फ्लूला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. काळजी न घेतल्यास साथीचे आजार पसरून आरोग्य धोक्यात येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. आठ वर्षांपासून स्वाइन फ्लूने शहरात बस्तान बसवले असून, यावर्षीही त्याची तीव्रता वाढते आहे. सरकारी व खासगी रुग्णालयातील स्वाइन फ्लू बाधीत रुग्णांची संख्या बघता ही तीव्रता लक्षात येते. या पार्श्वभूमीवर शहरातील डॉक्टर्स, मनपा प्रशासन व नागरिकांनी एकत्रीतरीत्या प्रयत्न करून स्वाइन फ्लूचा प्रतिकार करावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
स्वाइन फ्लूची साथ पसरते आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. पण गरोदर महिला व लहान मुलांना स्वाइन फ्लूचा संसर्ग लवकर होतो. त्यामुळे गरोदर मातांनी ६व्या महिन्यात स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस अवश्य घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. प्रतिकारशक्ती कमी असेल तर स्वाइन फ्लूची लागण लवकर होते. त्यामुळे सर्वांनीच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. सर्दी, खोकला अंगावर काढू नका. त्यामुळे स्वाइन फ्लू असेल तर तो वाढत जाऊ शकतो. - डॉ. निवेदिता पवार,  स्त्रीरोगतज्ज्ञ
स्वाइन फ्लू बाधितांची संख्या वाढत चालली आहे. नागरिकांनी गर्दीत जाऊ नये. तोंडावर मास्क लावावा. लहान मुले, माता, वयोवृद्ध नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे. भरपूर पाणी पिणे, पूरक आहार घेणे, स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्यास तत्काळ सरकारी दवाखान्यात जावे. गौरीगणपती आता तोंडावर आले आहेत. या दिवसात गर्दीत जाण्याचा प्रसंग येतोच. त्यामुळे काळजी घ्यावी. स्वाइन फ्लूचे निदान झाल्यास टॅमी फ्लूची ट्रिटमेंट तत्काळ सुरू करावी. स्वाइन फ्लूसारखे आजार नियंत्रणात आणणे पूर्णत: नागरिकांच्या हातात आहे, हे लक्षात घ्यावे. - डॉ. विजय डेकाटे, वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका
तापाची साथ चालू झाली आहे. दोन तीन दिवस सातत्याने ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. खोकला, शिंका येत असलेल्यांनी स्वत:हून मास्क लावून वावरावे. स्वाइन फ्लूची टेस्ट केल्याशिवाय आणि त्याचा निकाल आल्याशिवाय त्याची तीव्रता समजत नाही. त्यामुळे स्वाइन फ्लू असेल किंवा नसेल तरीही काळजी घेत रहाणे महत्त्वाचे आहे. स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस २ वर्षांपासून प्रौढ नागरिकांपर्यंत साºयांसाठी आहे. वर्षातून एकदा ती घेतल्यास वर्षभर स्वाइन फ्लूपासून सुरक्षितता मिळते.
- डॉ. नरेंद्र पाटील, फॅमिली फिजीशियन
स्वाइन फ्लूची लक्षणे
ताप, घसादुखी, घशाला खवखव होणे, खोकला येणे, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी ही स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्यास २४ तासांच्या आत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करावा. उपचारास २४ तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास रुग्णांची प्रकृती गंभीर होऊन गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. स्वाइन फ्लूवर उपचार म्हणून टॅमीफ्लूच्या गोळ्यांचा वापर केला जातो. परंतु, रुग्णाला लागण झाली असल्यासच डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घेतल्या पाहिजेत. शहरातील सरकारी व मनपा रुग्णालयांमध्ये या गोळ्या उपलब्ध करून दिल्या जातात, शिवाय मेडिकल स्टोअर्समध्येही त्या उपलब्ध आहेत.

Web Title:  Swine Flu risk during the celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.