अकरा महिन्यांत ७३ बळी घेणारा ‘स्वाइन फ्लू’ ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:07 AM2017-11-18T01:07:37+5:302017-11-18T01:10:11+5:30
शहरात गेल्या अकरा महिन्यांत तब्बल ७३ बळी घेणाºया स्वाइन फ्लूचा जोर आता ओसरत चालला असताना डेंग्यूच्या आजाराने मात्र थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत घसरलेले तपमान व बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची गर्दी दवाखान्यांमध्ये दिसून येत आहे.
नाशिक : शहरात गेल्या अकरा महिन्यांत तब्बल ७३ बळी घेणाºया स्वाइन फ्लूचा जोर आता ओसरत चालला असताना डेंग्यूच्या आजाराने मात्र थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत घसरलेले तपमान व बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्याच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची गर्दी दवाखान्यांमध्ये दिसून येत आहे. शहरात स्वाइन फ्लूने नाशिककर बेजार झाले होते. १ जानेवारी ते १७ नोव्हेंबर या कालावधीत नाशिक महापालिका हद्दीतील २६४ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यातील ३१ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर हद्दीबाहेरील २३० रुग्णांना लागण होऊन त्यातील ४२ रुग्णांचे स्वाइन फ्लूने बळी गेले. गेल्या अकरा महिन्यांत स्वाइन फ्लूने एकूण ७३ रुग्णांचे बळी घेतले. आता तपमानात घट होऊ लागल्यानंतर स्वाइन फ्लूचा पुन्हा एकदा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच जोर ओसरताना दिसून येत आहे. दि. १ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत मनपा हद्दीतील ४, तर हद्दीबाहेरील २ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झालेली आहे. आॅक्टोबर महिन्यात मनपा हद्दीतील ३३ रुग्णांना लागण होऊन त्यातील दोघांचा मृत्यू झाला होता.
कर्मचारी वर्ग अपुरा
महापालिकेकडे डास प्रतिबंधक धूर व फवारणी करण्यासाठी आवश्यक तेवढा कर्मचारीवर्ग उपलब्ध नसल्याची तक्रार आरोग्य विभागाकडून केली जात आहे. त्यामुळे घरोघरी फवारणीसाठी माणसे पोहोचू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेने तातडीने आउटसोर्सिंगने कर्मचारी भरती करून घरोघरी धूर व औषध फवारणीची मोहीम राबवावी, अशी मागणी सदस्यांकडून केली जात आहे.