घुमर घुमर घुमे रे...बाईसा घुमर घुमे रे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 01:43 AM2019-11-18T01:43:57+5:302019-11-18T01:44:26+5:30
घुमर घुमर घुमर.. बाईसा घुमर रे..., में तो नाच गाने ऐसा पायल भुल आयी..., होर रंग दे..., यांसारख्या बहारदार राजस्थानी गीतांवर हजारो महिलांनी घुमर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जींकली. निमित्त होते, घुमर नृत्य महोत्सवाचे.
नाशिक : घुमर घुमर घुमर.. बाईसा घुमर रे..., में तो नाच गाने ऐसा पायल भुल आयी..., होर रंग दे..., यांसारख्या बहारदार राजस्थानी गीतांवर हजारो महिलांनी घुमर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जींकली. निमित्त होते, घुमर नृत्य महोत्सवाचे.
तपोवन परिसरातील पटांगणात रविवारी (दि. १७) सायंकाळी मारवाडी युवा मंच मध्य, हेल्प इंडिया आॅनलाइन फाउंडेशन व रॉयल डेस्टिनेशन डेकोरेशन आणि इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘घुमर नृत्य महोत्सव’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आंतरराष्टÑीय धावपटू कविता राऊत, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, संजय विसावे, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, अनन्या पांडे, किशोर ओझा, नरेंद्र हर्ष, प्रभा मुंदडा आदी उपस्थित होते.
जिल्हाभरातील ५ हजार महिला या घुमर नृत्य महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. शहरात प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. . त्यामुळे नाशिकमध्ये असा कार्यक्रम होणे ही कौतुकास्पद बाब आहे. नृत्यासाठी महिला घागरा, चोली, ओढणी व विविध आभूषणे परिधान करून आल्या होत्या. लहान मुलांपासून तर वयोवृद्ध महिला यात सहभागी झाल्या होत्या. नृत्य करताना महिलांचा मोठा उत्साह होता. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत महिलांनी विविध राजस्थानी गीतांवर आपल्या नृत्याचा नजराना सादर केला. याप्रसंगी मारवाडी युवा मंचच्या अध्यक्ष प्रभा मुंदडा, सचिव निकिता कोठारी, उपाध्यक्ष सुरुची पोद्दार, रोशनी राठी, अमित बोरा, चेतन भंडारी, दीपाली चांडक, शिल्पी अवस्थी, कुंदा शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. जगदीश पारेख यांनी केले.
विश्वविक्रमाची नोंद
घुमर नृत्य महोत्सवात एकाचवेळी पाच हजार एक महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवत राजस्थानी घुमर नृत्य सादर केले. यामुळे या कार्यक्रमाने एक वेगळा विश्वविक्रम केला. यासाठी लंडन बुक आॅफ रेकॉर्ड व गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या कार्यक्रमाची नोंद करण्यात आली. या विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी लंडन बुक आॅफ रेकॉर्ड बुक व गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड बुकचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी या रेकॉर्डची घोषणा करण्यात आली.
घुमर नृत्य महोत्सव या अनोख्या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध भागांतून राजस्थानी महिला या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तसेच राजस्थानी महिलांसोबत विविध जाती-धर्मातील महिलांनीही या नृत्य महोत्सवात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. यात लहान मुलींपासून तर वयोवृद्ध महिलांनी यात सहभाग घेतला होता. महिलांनी यासाठी विविध प्रकारचे राजस्थानी पोशाख परिधान केले होते. यात घागरा, चोली, ओढणीसह विविध आभूषणे धारण केली होती, तर काहींनी पायात घुंगरू बांधून यात सहभागी झाल्या होत्या.