सय्यद महमूद अशरफ : प्रसिध्दीसाठी धार्मिक मुद्यांचा आधार घेणे गैर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 05:54 PM2018-03-11T17:54:28+5:302018-03-11T17:54:28+5:30
शहरात अहैले सुन्नत रिसर्च सेंटरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विविध मार्गदर्शक धार्मिक साहित्यावर आधारित पुस्तकांच्या मोफत वाटपप्रसंगी अशरफ मिया रविवारी (दि.११) जुने नाशिक भागात आले होते.
नाशिक : प्रसिद्धीचा झोत ओढवून घेण्यासाठी धार्मिक भावनांचा खेळ करणे हे भारतीय संस्कृतीला न शोभणारे आहे. त्यामुळे जे लोक इस्लाम किंवा अन्य धर्माच्या विरोधी वारंवार भाष्य करतात, त्यांनी ते थांबवावे कारण ते भारतीय संस्कृतीला एकप्रकारे डाग लावण्याचे काम करत आहे, असे मत अहैले सुन्नत रिसर्च सेंटरचे प्रमुख ज्येष्ठ मुस्लीम धर्मगुरू हजरत सय्यद महमूद अशरफ जिलानी यांनी केले.
शहरात अहैले सुन्नत रिसर्च सेंटरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विविध मार्गदर्शक धार्मिक साहित्यावर आधारित पुस्तकांच्या मोफत वाटपप्रसंगी अशरफ मिया रविवारी (दि.११) जुने नाशिक भागात आले होते.
यावेळी त्यांनी ‘खतीब हवेली’ येथे पत्रकार परिषद घेऊन तिहेरी तलाक, देशाची संस्कृती व इतिहास, पाश्चात्त्य देशांमध्ये उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती, देशाचे राजकीय धोरण, सरकारची भूमिका, मानवतावाद आणि इस्लाम या विषयांवर ओघवत्या शैलीत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, ज्यांना भारताची सिरियासारखी स्थिती होण्याची भीती वाटते त्यांनी आपली मानसिक तपासणी करून घ्यावी. भारत हा सुफीसंतांचा देश आहे. येथील समाजव्यवस्था संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे, असेही ते म्हणाले. धार्मिक मुद्यांचा आधार घेत वेगवेगळे वक्तव्य करणे हे परिपक्वता व प्रगल्भतेचे लक्षण तर नाहीच मात्र समाजात अस्थिर वातावरण पसरवत प्रसिध्दीच्या झोतात येण्यासाठी पुरक ठरणारे कृत्य नक्कीच आहे, असे ते म्हणाले. जे लोक अशाप्रकारे गरळ ओकतात ते राष्ट किंवा समाजहित व संस्कृतीचा कधीही विचार करु शकत नाही, किंबहूना त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवणेही गैर आहे, असे अशरफ म्हणाले. याप्रसंगी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी उपस्थित होते.
धार्मिक पुस्तकांचे वाटप
अहैले सुन्नत रिसर्च सेंटरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या तोहफ-ए-मोहम्मदीया, ट्रिपल तलाक अॅन्ड हलाला, फिरक-ए-यजीद, अहकाम-ए-मय्यत कोर्स, द मॅसेज आॅफ ह्युमॅनिटी, फिरक-ए-मुर्जिआ और वहाबिया, लकब-ए-इमाम-ए-आझम आदी पुस्तकांचे वाटप समाजातील डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार, साहित्यिक वर्गातील व्यक्तींना महमूद अशरफ यांच्या हस्ते करण्यात आले.