‘प्रतीकात्मक सिग्नल’ आंदोलन

By Admin | Published: March 27, 2017 12:27 AM2017-03-27T00:27:29+5:302017-03-27T00:27:47+5:30

नाशिक : गत आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकीधारक महिलांना भरधाव कारने धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

'Symbolic signal' movement | ‘प्रतीकात्मक सिग्नल’ आंदोलन

‘प्रतीकात्मक सिग्नल’ आंदोलन

googlenewsNext

नाशिक : गत आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकीधारक महिलांना भरधाव कारने धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रविवारी (दि़२६) सायंकाळी जेहान सर्कल येथे त्वरित सिग्नल यंत्रणा बसवावी या मागणीसाठी लेवा सखी मंचच्या महिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नागरिकांनी प्रतीकात्मक सिग्नल तयार करून अभिनव आंदोलन केले़ गंगापूररोडवरील जेहान सर्कल, शहीद चौक, सप्तरंग हॉटेल या ठिकाणी मोठ्या संख्येने अपघात होतात़ या अपघातांना आळा घालण्यासाठी याठिकाणी सिग्नल बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़ गत आठवडाभरात नीलिमा चौधरी व प्रा़ रूपाली पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला़ यामुळे परिसरातील महिला व नागरिकांनी रविवारी सायंकाळी जेहान सर्कलवर एकत्र आले़ यातील महिलांच्या हातामध्ये वाहतूक नियमांचे पालन करा, वेगमर्यादा पाळा या जनजागृतीपर घोषणांचे फलक होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, किशोर सिरसाठ यांनी प्रतीकात्मक सिग्नल तयार करून त्याद्वारे वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, आमदार सीमा हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांनी आंदोलनकर्ते नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या़ (प्रतिनिधी)
महिलांनी जेहान सर्कल ते शहीद चौकापर्यंत मेणबत्ती पेटवून मृत्यूमुखी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली वाहिली़ या आंदोलनात लेवा सखी मंडळाच्या माधुरी चौधरी, भारती चौधरी, स्वाती पाचपांडे, अनिता झांबरे, अनिश चौधरी, राहुल वायकोळे यांसह मृत्यूमुखी पडलेल्या महिलांचे नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ दरम्यान, या ठिकाणी सिग्नल व गतिरोधक न टाकल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे़
पोलीस आयुक्तांकडे तक्रार
जेहान सर्कलवरील महिलांच्या आंदोलनाची दखल घेत पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल हे आंदोलनस्थळी पोहोचले होते़ यावेळी महिलांनी गंगापूर रोड हा केवळ आकाराने मोठा करण्यात आला़ त्यावर कुठेही गतिरोधक बसविलेला नाही़ तसेच रस्त्यावरील अतिक्रमण, वेगमर्यादा याचे फलक लावले नसल्याची तक्रार केली़ यावर पोलीस आयुक्तांनी वाहतूक सुरक्षा व खबरदारी प्रत्येक शहरवासीयांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले़


 

Web Title: 'Symbolic signal' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.