संगणक परिचालकांचे लाक्षणिक धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:05 AM2019-08-29T01:05:09+5:302019-08-29T01:05:39+5:30
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, राज्य शासनाच्या निधीतून १५ हजार किमान वेतन द्यावे, थकलेले मानधन तत्काळ द्यावे आदी महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी नाशिक तालुक्यातील संगणक परिचालकांनी बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
गंगापूर : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, राज्य शासनाच्या निधीतून १५ हजार किमान वेतन द्यावे, थकलेले मानधन तत्काळ द्यावे आदी महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी नाशिक तालुक्यातील संगणक परिचालकांनी बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. नाशिक पंचायत समितीसमोर सुरू केलेल्या धरणे आंदोलनप्रसंगी विविध घोषणा देऊन शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी संगणक परिचालक संघटनेचे नाशिक तालुकाध्यक्ष शांताराम बेंडकोळी यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे सहायक गटविकास अधिकारी विनोद मेढे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी १९ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे संगणक परिचालकांचे कुटुंब उपासमार सहन करीत आहे. काही महिन्यांपासून मानधन थकले असून, संगणक परिचालकांनी अनेक प्रकारचे कर्ज काढून ते फेडत नसल्याने चिंतेत आहेत. शासनाने संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन आश्वासनाची पूर्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नाशिक पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात हिरामण बेंडकोळी, निशांत डंबाळे, विनायक सूर्यवंशी, समाधान ससाणे, सीमा गोसावी, पूजा राजपूत, पूजा कुलकर्णी, शांताराम निंबेकर, रोहित अनवट, लहानू कचरे, बहिरू निंबेकर, चंद्रकांत थेटे, रोहित गायकवाड आदी सहभागी झाले होते.