जिल्ह्यात ४ टक्के बालकांमध्ये लठ्ठपणाची लक्षणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:14 AM2021-03-06T04:14:03+5:302021-03-06T04:14:03+5:30
नाशिक : जिल्ह्यात लहान मुलांमध्ये लठ्ठपणात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. गुबगुबीत आहे, असे म्हणून लहानग्यांच्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केले ...
नाशिक : जिल्ह्यात लहान मुलांमध्ये लठ्ठपणात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. गुबगुबीत आहे, असे म्हणून लहानग्यांच्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केले जात असले तरी हा लठ्ठपणा त्यांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. जिल्ह्यात तब्बल ४ टक्के बालकांमध्ये लठ्ठपणाची लक्षणे असून हे प्रमाण येत्या काही वर्षात वाढण्याची शक्यता आहे.
जन्मानंतर सुरुवातीच्या काळात लहान बालके ‘बेबी फॅट’ ज्याला आपण बाळसं म्हणतो, त्यामुळे गुटगुटीत दिसतात. ते काही प्रमाणात चांगलेदेखील असते. मात्र हळूहळू बालकांचं वय वाढते तसे त्यांच्या शरीरावरचं बाळसं कमी होऊन ती सडपातळ दिसू लागतात. काही बालकांमध्ये शालेय वयोगटात म्हणजे सहाव्या-सातव्या वर्षानंतर शरीरातील चरबी कमी होण्याऐवजी वाढतच जाते. या वयात मुलांचे वजन आवश्यकतेपेक्षा जास्त वाढलेले आढळते. हा अतिरेकी लठ्ठपणा हा खाण्या- पिण्याच्या वाईट सवयी, व्यायामविरहीत आणि फारशा हालचालीविना असणाऱ्या दिनक्रमामुळे होते. आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात उच्च उष्मांकयुक्त सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पौष्टिक घटक मिळत नाहीत. मात्र, शरीरावर अतिरिक्त चरबीचं प्रमाण वाढू लागते. लहान मुलांची जीवनशैलीही लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतेय. हल्ली लहान मुले टीव्ही आणि मोबाइल या गोष्टींमध्ये फार वेळ घालवतात. मैदानावर जाण्याचे आणि शारीरिक क्रिया करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आहे. तसेच ज्यांचे पालक किंवा परिवारातील सदस्य लठ्ठ असतील, त्यांच्यात लठ्ठपणा असण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय लठ्ठपणाचे सर्वांत दुर्लक्षित कारण म्हणजे, हॉर्मोनल समस्या असल्याने शरीरावर अनैसर्गिक सूजदेखील दिसू शकते.
इन्फो
विकासात अडसर
लठ्ठ असलेली मुले शाळेत अन्य मुलांच्या उपहासाचा विषय होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेत न जाण्याची इतरांमध्ये न मिसळण्याची भावना निर्माण होऊ शकते. त्यातून मग सर्वांगीण वाढ खुंटण्याची शक्यता असते. अशावेळी लठ्ठपणा हा सर्वांगीण विकासात अडसर ठरण्याचीही शक्यता असते. लठ्ठपणा मोजण्यासाठी ‘बॉडीमास इंडेक्स’ हे एक गुणोत्तर वापरून बालकाची उंची आणि त्या अनुषंगाने आवश्यक चरबी मोजली जाते. हे प्रमाण जास्त असेल, तर बालक लठ्ठ आहे असे समजावे. मात्र, यावर अवलंबून न राहता त्वचेची जाडी, कंबरेचा घेर या गोष्टीही पाहणे आवश्यक आहे. एका सर्वेक्षणाच्या अहवालातून पाच वर्षांच्या आतील बालकांचे उंचीच्या तुलनेत वजन अधिक असलेल्या बालकांचे प्रमाण ३.८ टक्के आहे.
इन्फो
संप्रेरकांची जलद निर्मिती
जादा वजन असलेल्या बालकांमध्ये इतरांपेक्षा नैसर्गिकरित्या मानसिक ताण वाढविणाऱ्या संप्रेरकांची जलद निर्मिती होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. तणावामुळे शरीरामध्ये हायड्रोकॉर्टिझोन संप्रेरकाची निर्मिती होते. जेव्हा एखादा व्यक्ती जास्त काळ तणावात जगत असल्यास हायड्रोकॉर्टिझोन आणि तणावात भर पाडणारी संप्रेरके रक्तावरही परिणाम करणारी ठरतात. यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असा दावा संशोधकांनी केला आहे.
इन्फो
नियमित व्यायाम आवश्यक
लहान मुलांमधला लठ्ठपणा टाळण्यासाठी सर्वप्रथम त्यांना मैदानावर खेळण्यास आणि नियमित व्यायाम करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवे. मैदानी खेळ, पोहणे आणि सायकलिंगसारखे व्यायाम निश्चितच लाभदायक ठरू शकतात. त्याशिवाय आहारावर नियंत्रण ठेवण्यासह. फास्ट फूड खाण्यावर नियंत्रण आणले पाहिजे. तसेच आहार हा सर्वसमावेशक असावा. शीतपेयांची सवय मुलांना लावू नये. आहार आणि निद्रा यांचा समतोल असायला हवा.
-----------
ही डमी आहे.