दुसरी लाट दीडपट आली तरी यंत्रणा सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:36 AM2020-12-04T04:36:00+5:302020-12-04T04:36:00+5:30
नाशिक : दिवाळीनंतर काेरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. ही लाट किती मोठी ...
नाशिक : दिवाळीनंतर काेरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. ही लाट किती मोठी असेल याबाबतची शाश्वती काहीच देता येत नसली तरी पहिल्यापेक्षा दीडपट अधिक लाट आली तरी प्रशासन त्याचा सामना करू शकेल अशी तयारी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. मात्र नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती देताना जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभाग सज्ज असल्याचे सांगितले. सध्या अडीचशे ते तीनशे रुग्ण दररोज आढळून येत आहेत. प्रशासनाने टेस्टिंग कमी केलेल्या नाहीत. याउलट जेथे गरज आहे तेथे रुग्णांची तपासणी आवर्जून केली जात आहे. दाखल रुग्णांच्या संख्येत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने अजूनही दिलासादायक चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाची भीती बऱ्यापैकी कमी झालेली आहे; परंतु संकट मात्र टळलेले नाही. रुग्णांना आता रुग्णालयातच जाऊन उपचार घ्यावे लागत नाहीत तर अनेक रुग्ण घरी उपचार घेऊन बरे झालेले आहेत. जिल्ह्यातील ऑक्सिजन पूर्वी ३५ ते ४० मेट्रिक टन इतके होते आता त्याची क्षमता वाढून ७४ मेट्रिक टन इतके झालेले आहे. बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाक्या उभारण्यात आल्याने आपली सज्जता वाढली आहे. पुरेसा औषधसाठादेखील करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. सद्य:स्थितीत पाचशे व्हेंटिलेटरची सज्जता करून ठेवण्यात आलेली आहे.
--कोट---
सामाजिक संकट
प्रशासकीय यंत्रणा सज्ज असली तरी नागरिकांची साथ मोलाची ठरणार आहे. मास्कचा वापर नियमित केला पाहिजे. उगाच बाहेर जाणे टाळणे महत्त्वाचे आहे. कुणीतरी कारवाई करेल तेव्हाच नियमांचे पालन करण्याची मानसिकता बदलली पाहिजे. हे एक सामाजिक संकट ओळखून प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी