सिडकोत बसवणार भारतीय लष्कराचा टी-५५ रणगाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:49 AM2019-02-28T00:49:19+5:302019-02-28T00:49:37+5:30
भारतीय सैन्याच्या पराक्रमाची नागरिकांना माहिती व्हावी आणि युवकांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, या हेतूने पाकिस्तानशी झालेल्या युद्धांत शत्रूला धूळ चारणारा भारतीय टी-५५ हा रणगाडा प्रभाग क्र.२४ मध्ये बसवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी दिली.
सिडको : भारतीय सैन्याच्या पराक्रमाची नागरिकांना माहिती व्हावी आणि युवकांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, या हेतूने पाकिस्तानशी झालेल्या युद्धांत शत्रूला धूळ चारणारा भारतीय टी-५५ हा रणगाडा प्रभाग क्र.२४ मध्ये बसवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी दिली.
भारतीय लष्कराचे सामर्थ्य, पराक्रम, बलिदानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी आणि युवकांना सैन्यदलात भरती होऊन देशसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक आपल्या प्रभागात असावे, अशी मागणी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी भारताचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे मांडली होती. डॉ. भामरे यांनी या संकल्पनेला त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे तिदमे यांनी याबाबत महापालिका आणि संरक्षण विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश लाभले असून, विजयाचे प्रतीक (वॉर ट्रॉफी) म्हणून पाकिस्तानशी झालेल्या युद्धांत पराक्रम गाजविणारा टी-५५ हा रणगाडा देण्यास भारतीय लष्कराने मंजुरी दिली आहे. सुमारे ३६ टन वजन असलेल्या आणि रशियन बनावटीच्या टी-५५ रणगाड्यांनी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. सन १९७१ च्या युद्धात गरीबपूरमध्ये प्रथमच टी-५५ रणगाड्यांचा वापर करण्यात आला होता. त्यात या रणगाड्यांनी पाकिस्तानला धूळ चारली होती. बसंतर, बारापिंड येथे तर भारतीय टी-५५ या रणगाड्यांनी, तर ४६ पाकिस्तानी रणगाडे नष्ट केले होते. असे अनेक पराक्र म केलेला टी-५५ रणगाडा लवकरच पुण्याहून प्रभाग क्रमांक २४ मध्ये आणण्यात येणार आहे.