तबल्याची जुगलबंदीला कथ्थक नृत्याविष्काराची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:59 AM2019-02-26T00:59:32+5:302019-02-26T00:59:49+5:30
तबलावादनातील पेशकार, कायदे, रेले, गत, तुकड्यांनी रसिकांना तल्लीन केल्यानंतर त्यावर कळस चढवला तो कथ्थक नृत्याविष्काराने. विशेषत: दीपचंद तालातील ‘होरी’ नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. निमित्त होते पवार तबला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तालाभिषेक’ महोत्सवाचे.
नाशिक : तबलावादनातील पेशकार, कायदे, रेले, गत, तुकड्यांनी रसिकांना तल्लीन केल्यानंतर त्यावर कळस चढवला तो कथ्थक नृत्याविष्काराने. विशेषत: दीपचंद तालातील ‘होरी’ नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. निमित्त होते पवार तबला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तालाभिषेक’ महोत्सवाचे.
संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.२५) हा कार्यक्र म रंगला. प्रारंभी निमिष घोलप व बल्लाळ चव्हाण यांचे तबला सहवादन झाले. त्यांनी ताल झपतालात परंपरेप्रमाणे उठाण, पेशकार, कायदे, रेले, चलन, गत, तुकडे व चक्र दार रचना सादर केल्या. त्यांना ज्ञानेश्वर कासार यांनी गायनाची, तर पुष्कराज भागवत यांनी संवादिनीची साथसंगत केली. त्यानंतर संजीवनी कुलकर्णी व सुमुखी अथनी यांचे कथ्थक नृत्य रंगले. कार्यक्र माच्या उत्तरार्धात पुणे येथील अजिंक्य जोशी व पांडुरंग पवार यांच्यात तबला जुगलबंदी रंगली. त्यांनी तीन तालातील पेशकार, कायदे, रेले आदी रचना सादर केल्या. केरवा तालातील ‘लग्गी लडी’ने जुगलबंदीत विशेष रंगत आणली. प्रशांत महाबळ यांनी संवादिनीवर साथ केली.
प्रारंभी मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, नगरसेवक शाहू खैरे, रघुवीर अधिकारी, मनीषा अधिकारी, कुसुम अधिकारी, बलवीर अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सुनेत्रा महाजन-मांडवगणे यांनी सूत्रसंचालन केले.
कुलकर्णी यांनी कृष्णवंदना, तर त्यानंतर अथनी यांनी ताल अष्टमंगल सादर केले. त्यात त्यांनी आमद, तत्कार, नटवरी तोडे, यति, परण, चक्र दार, लडी पेश करीत रसिकांची दाद घेतली. कुलकर्णी यांनी ‘होरी खेलन कैसे जाऊं’ या दीपचंदी तालातील बंदिशीवर अप्रतिम ‘होरी’ नृत्य सादर केले. त्यांना पुष्कराज भागवत (गायन व संवादिनी), सुजित काळे (तबला), मोहन उपासनी (बासरी) यांनी साथसंगत केली.