टवाळखोरांकडून संरक्षक भिंतीला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:28 AM2018-07-12T00:28:55+5:302018-07-12T00:29:11+5:30
दिंडोरीरोडवरील मेरी हायड्रो परिसरात असलेल्या जलविज्ञान प्रकल्प कार्यालयाच्या संरक्षित भिंतीला परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या टवाळखोरांनी भगदाड पाडून कार्यालयाच्या आवारात विनापरवाना ये-जा सुरू केली असून, त्यामुळे या भागातील मोरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पंचवटी : दिंडोरीरोडवरील मेरी हायड्रो परिसरात असलेल्या जलविज्ञान प्रकल्प कार्यालयाच्या संरक्षित भिंतीला परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या टवाळखोरांनी भगदाड पाडून कार्यालयाच्या आवारात विनापरवाना ये-जा सुरू केली असून, त्यामुळे या भागातील मोरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दिंडोरीरोडवर शासनाचे जलविज्ञान प्रकल्प कार्यालय असून, मेरी परिसरात अन्य शासकीय कार्यालये आहेत. जलविज्ञान प्रकल्पाच्या कार्यालय व मोकळ्या जंगली भागात काही झोपडपट्टीधारक दिवसा व रात्रीच्या वेळी शिरकाव करतात. त्यामुळे संपूर्ण कार्यालयाच्या भोवती संरक्षक भिंत उभारण्यात आली होती, मात्र टवाळखोरांनी पंधरा दिवसांतच सीमेंट काँक्रीटची भिंत पोखरून कार्यालय परिसर व मेरी हायड्रो जंगलात मुक्त संचार सुरू केला आहे. या टवाळखोरांना अडविल्यास त्यांच्याकडून कर्मचाºयांना शिवीगाळ व मारहाणीचे प्रकार घडत आहेत. हायड्रो परिसरात दाट झाडीझुडपे असल्याने अनेक मोरांचे वास्तव्य असून, काही टवाळखोर मोरांची शिकार करत असल्याने मेरीच्या जंगलातील मोरांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. टवाळखोर रात्री भगदाड पाडलेल्या संरक्षक भिंतीतून प्रवेश करून खुलेआम मद्यपान करतात. काही दिवसांपूर्वीच टवाळखोरांनी याच कार्यालयातील झाडे पेटवून देण्याचा प्रयत्नही केल्याची घटना उघडकीस आली होती.