‘तडीपारा’स उमेदवारी

By admin | Published: November 5, 2016 03:34 AM2016-11-05T03:34:07+5:302016-11-05T03:42:02+5:30

भाजपा : येवल्यात सूचकांच्या माध्यमातून अर्ज

Tadipara's candidature | ‘तडीपारा’स उमेदवारी

‘तडीपारा’स उमेदवारी

Next

नाशिक : राजकारणातील गुन्हेगारीच्या नावे आजवर खडे फोडणाऱ्या भाजपाने नाशिक शहरात कुप्रसिद्ध गुन्हेगार नगरसेवक पवन पवार यास पक्ष प्रवेश देऊन पावन करण्याच्या प्रयत्नांनंतर येवला नगरपालिका निवडणुकीत चक्क वर्षभर हद्दपार केलेल्या गुन्हेगारास पक्षाची उमेदवारी बहाल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपाच्या या कृतीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असून, विशेष म्हणजे शहरातून हद्दपार केलेल्या या गुंडाने पोलिसांच्या नाकावर टिचून आपल्या समर्थकांकरवी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कुणाल ऊर्फ बंटी किशोर परदेशी (३०) रा. बुंदेलपुरा, येवला असे या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. येवला शहर, मनमाड, वैजापूर, कोपरगाव अशा विविध पोलीस ठाण्यांत त्याच्या विरुद्ध दरोडा घालणे, जिवे मारण्याचा प्रयत्न, दंगल माजविणे, चोरी, शासकीय अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे एक डझन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवाया व समाजस्वास्थ्यास निर्माण होणारी बाधा लक्षात घेता मनमाड पोलीस उपअधीक्षक कार्यालयाने १६ नोव्हेंबर २०१५ रोजी हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठविला, या प्रस्तावाची सुनावणी झाल्यानंतर २५ जुलै २०१६ रोजी निफाड उपविभागीय अधिकाऱ्यांनी कुणाल ऊर्फ बंटी किशोर परदेशी यास नाशिक जिल्हा, औरंगाबाद जिल्ह्णातील वैजापूर तसेच अहमदनगर जिल्ह्णातील कोपरगाव तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात येत असल्याचे आदेश काढले. येवला पोलिसांनी १७ आॅगस्ट २०१६ रोजी या आदेशाची अंमलबजावणी करीत बंटी परदेशी यास राहता येथे सोडून दिले व नाशिक जिल्ह्णात तसेच वैजापूर व कोपरगाव येथे एक वर्ष प्रवेश करू नये तसेच राहता येथे तो ज्या ठिकाणी रहिवास करेल तेथील निवासाचा पत्ता देणे बंधनकारक केले. अशी पूर्वपिठीका असताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब गटलू जाधव यांनी येवला नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ (ब) मधून अधिकृत उमेदवार म्हणून ए-बी अर्जही हाती सुपूर्द केल्याने दि. २८ आॅक्टोबर रोजी गुन्हेगार बंटी परदेशी याच्या समर्थक सूचकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्याच्या भाजपाच्या या प्रयत्नाची जोरदार चर्चा येवल्यात होत असून, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेली व्यक्ती मतदारांवर मतदानासाठी धाकदपडशा व दबाव टाकण्याची शक्यता अधिक आहे. त्याच्या उमेदवारीने प्रभागातील मतदारही भयभीत झाले आहेत.

Web Title: Tadipara's candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.