ताहाराबाद : मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईसह आजीचा बुडून मृत्यू
By admin | Published: November 4, 2014 11:58 PM2014-11-04T23:58:54+5:302014-11-04T23:59:23+5:30
ताहाराबाद : मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईसह आजीचा बुडून मृत्यू
ताहाराबाद : येथून जवळच असलेल्या द्वारकाधीश साखर कारखान्यालगतच्या नालाबांधमध्ये असलेल्या पाण्यात बुडणाऱ्या तीन वर्षाच्या बालकास वाचविताना मुलाच्या आईसह आजीचा करूण अंत झाला.
द्वारकाधीश कारखान्याजवळ काठेवाडी वास्तव्यास आहेत. येथून जवळच असलेल्या नालाबांधमध्ये कपडे धुण्यासाठी महिला रोज जात. मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास बेनाबाई सोंडा पवार (२८), अतीबाई सव्वाभाई पवार (४५) व सोनाबाई राहुल पवार (२५) या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत महेश सोंडा पवार (३) हा बालकही होता. महेश पाण्यात खेळता खेळता पाण्यात गेला. हे त्याची आई बेनाबाईच्या लक्षात येताच ती त्याला पाण्यातून काढण्यासाठी गेली. महेशला पाण्यातून काढत असताना तिचा पाय सरकल्याने तिने महेशला किनाऱ्यावर फेकले. काठावरील सोनाबाईने महेशला झेलले. परंतु त्याचवेळी बेनाबाई पाण्यात बुडू लागल्याने तिला वाचविण्यासाठी चुलत सासू अतीबाई पाण्यात उतरल्या. मात्र दोघी पाण्यात बुडाल्या. काठावर उभ्या असलेल्या सोनाबाईने आरडाओरड केली. काठावर वाचविणाऱ्यांची गर्दी होईपर्यंत या दोघींचा बुडून मृत्यू झाला होता.
याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघींच्या मृतदेहाचे नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्यावर बुधवारी सकाळी ९ वाजता अंतापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बेनाबाईच्या पश्चात मुलगा, दोन मुली तर अतीबाईच्या पश्चात पती, पाच मुले, मुलगी असा परिवार आहे.