तहसीलचा कारभार दोन ठिकाणी
By admin | Published: January 16, 2016 10:02 PM2016-01-16T22:02:30+5:302016-01-16T22:19:07+5:30
इगतपुरी : शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांत संभ्रम
घोटी : इगतपुरीच्या तहसील कार्यालयाची ब्रिटिशकालीन इमारत जीर्ण झाल्याने तहसील कार्यालयासाठी शासनाच्या वतीने दोन वर्षापासून बांधण्यात आलेली
इमारत बांधकामापासून वादग्रस्त ठरल्याने महसूल विभागाने ताब्यात घेण्यास सातत्याने नकार दिला
होता.
सदर इमारत तयार होऊनही तिचा वापर का करण्यात येत नाही, असा सवाल विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे गेल्याने अखेर या इमारतीत कामकाज सुरू करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने, या नूतन कार्यालयात इगतपुरी तहसील कार्यालयाचा अर्धा कारभार
नवीन वर्षापासून सुरू झाले आहे.
मात्र काही विभागाचा कारभार अद्यापही जुन्या कार्यालयातूनच होत असल्याने शासकीय कामकाजासाठी ग्रामीण भागातून तहसील कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांची मोठी
गैरसोय होत आहे. या कार्यालयाचे कामकाज एकाच ठिकाणी करण्यात यावे, अशी मागणी होत.
इगतपुरी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली तहसील कार्यालय आवारात पोलीस ठाणे, भूमिअभिलेख कार्यालय आदि विभाग असल्याने या इमारतीची जागा वापरासाठी अपुरी पडत होती. यामुळे तहसील कार्यालयाला स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय व्हावे यासाठी आमदार निर्मला गावित यांनी पाठपुरावा करून नूतन इमारतीसाठी निधी मंजूर केला होता.
दरम्यान, या इमारतीचे निर्लेखीकरण करून त्याच ठिकाणी नूतन इमारत व्हावी, असे अभिप्रेत असताना मात्र शासनाने इगतपुरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर बोरटेंभे गावाच्या शिवारात एका डोंगराच्या पायथ्याशी इमारत बांधून आपल्या अकलेचे तारे तोडले होते.
यामुळे या इमारतीचे काम गुणवत्तेचे नियम धाब्यावर बसवून करण्यात आले असल्याने इमारतीची रचना, गुणवत्ता ढासळली आहे. या इमारतीचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले असतानाही ही इमारत ताब्यात घेण्यास महसूल विभागाने नकार दिला होता.
तहसील कार्यालयासाठी
नवीन बांधण्यात आलेली इमारत गुणवत्ता व निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप होत याबाबत बांधकाम विभाग आणि इमारतीचे बांधकाम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला दोषी धरून कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचा तारांकित प्रश्न थेट विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. (वार्ताहर)