ताई आणि भावांनो, ही मेट्रो आहे, बस नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:24 AM2021-02-06T04:24:11+5:302021-02-06T04:24:11+5:30
नाशिक- अखेर त्रासलेल्या सर्वसामान्य नागरिक आणि पायपीट करणारा प्रवासी यांना एकदम बम्पर लॉटरी लागली आणि बस बरोबरच थेट ...
नाशिक- अखेर त्रासलेल्या सर्वसामान्य नागरिक आणि पायपीट करणारा प्रवासी यांना एकदम बम्पर लॉटरी लागली आणि बस बरोबरच थेट मेट्रोही मंजुर झाली. तहानलेल्या पाथंस्ताला पाण्याबरोबरच थेट अमृताचा लाभ झाला आणि आता काय करावे काय नाही अशी अवस्था झाली. आधी श्रेयवाद आणि मग मागण्यांची स्पर्धा सुरू झाली. भाऊ म्हणताहेत मेट्रो इकडे आमच्याकडे वळवा आणि ताई म्हणतात नाही आधी आमच्याकडे वळवा... ही वळवावळवी आणि पळवापळवी बघून मनोरंजन न होईल तर नवलच! मुळात गल्लीबेाळात नेण्यासाठी ही रिक्षा किंवा बस नाही, मेट्रो आहे, ताई आणि भाऊ हे आधी लक्षात घ्या असे सांगण्याची वेळ आली आहे.
मेट्रो आणि बस एकाच वेळी सुरू हाेण्याचा घबाड याेग लाभला असला तरी दोन्ही केव्हा सुरू होतील हे आज सांगणे शक्यच नाही. महापालिकेची शहर बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय २०१८ मध्ये झाला मात्र तीन वर्षे उलटून अजून ही बस रस्त्यावर आली नाही तेथे मेट्रोचे काय? केंद्र शासनाने नाशिककरांना अर्थसंकल्पातून गिफ्ट देण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. अनेकांनी तर नाशिक महापालिकेला स्वत:ची बस सेवा सुरू करता आली नाही आणि लोक मेट्रो येणार म्हणून खूश होत आहेत, अशी सोशल मीडियावर टिंगलही केली. परंतु मागणी करणारे त्याही पुढे गेले आहेत. ही सेवा सुरू करण्यासााठी श्रेय कोणाचे हे तर अद्याप निश्चित झाले नसले तरी किमान विकासाची ही गंगा आपल्या अंगणी आणण्यासाठी आणि त्याचे श्रेय लाटण्यासाठी मात्र स्पर्धा सुरू झाली आहे. सिडकोतील एका बाजूने ही मेट्रो न्या अशी ‘अपूर्व’ मागणी एका भाऊंनी केली तर दुसरीकडे एका ताईंनी देखील मेट्रो आपल्या मतदार संघाच्या ‘सीमा’ रेषेत आणण्याचा प्रयत्न केला. ही तर सुरुवात आहे, काहींनी तर ओझरपासून सिन्नर आणि त्र्यंबकपर्यंत सेवा फिरवण्याच्या मागण्या आत्ताच सुरू केल्या आहेत. आता मेट्रो याची तेव्हा येईल परंतु तो पर्यंत अशा मागण्यांचा जबरदस्त वर्षाव सुरूच झाला तर ‘मेट्रो सुरू करत नाही पण मागण्या आवर’ अशी म्हणण्याची वेळ महामेट्रोवर न येवो म्हणजे झाले.
इन्फो..
मेट्रोची ही अवस्था मग बसचे काय होणार भाऊ...
मेट्रोची आत्ताशी घोषणा झाली तर अशी स्थिती मग बस सेवेचे काय होणार भाऊ अशी आताच चर्चा जाणकारांमध्ये झडू लागली आहे. ए ड्रायव्हर माझा कार्यकर्ता या गल्लीत राहतो तेथे बस वळव, असे नगरसेवक आणि तत्सम सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन चालकांकडे खणाणू लागला तर चालक काय करतील? बस फायनल डेस्टीनेशनला न जाता दिवस भर कार्यकर्ते नगरसेवकांच्या कुटुंबीयांनाच सोडत बसेल, अशी मिश्कील चर्चा ही शहरात रंगली आहे.