तैवानच्या उद्योजकांना नाशिकची भुरळ
By Admin | Published: October 18, 2016 02:51 AM2016-10-18T02:51:02+5:302016-10-18T02:53:22+5:30
निमात चर्चा : परस्पर संबंध वाढविण्यावर एकमत
नाशिक : मुबलक हवा, पाणी आणि पायाभूत सुविधांबरोबरच उपलब्ध तंत्रज्ञान यामुळे तैवानने नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणुकीत स्वारस्य दाखविले असून, लवकरच उद्योजकांची ७० ते ८० सदस्यांचे शिष्टमंडळ नाशिकमध्ये येणार आहे. तैवान आणि नाशिक यांच्यात परस्पर औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय सोमवारी निमा या उद्योजकांच्या संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात घेण्यात आला.
नाशिक इंडस्ट्रीज अॅँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच निमाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास तैवान कौन्सुलेटचे विपणन विभागाचे असोसिएट रिसर्चर रूई वेंग शेन, ट्रेड प्रमोशन स्पेशालिस्ट सोनाली हुले प्रामुख्याने उपस्थित होते, तर निमाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर उपस्थित होते.
नाशिकमध्ये इंटिग्रेटेड स्टिल पार्ट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इंडस्ट्रीयल आॅटोमेशन, कंझुमर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक साहित्य उत्पादने या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगतानाच टेक्सटाइल पार्क उभारता येऊ शकतो. तसेच या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे आदान प्रदानदेखील होऊ शकते, असे निमाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राविषयी माहिती देणारी चित्रफितही दाखविण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर यांनी नशिकमध्ये उपलब्ध औद्योगिक झोनविषयी माहिती दिली. तसेच शासनाच्या इज आॅफ डुर्इंग बिझनेस प्रणालीमुळे नाशिकमध्ये येऊ घातलेल्या उद्योगांना कमीत कमी परवानग्या घ्याव्या लागतील आणि सवलतीही मिळणार असल्याचे सांगितले. प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी नाशिकमध्ये उपलब्ध औद्योगिक क्षेत्राची माहिती दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्र चेंबरचे संतोष मंडलेचा, मनीष कोठारी, संजीव नारंग, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, खजिनदार हर्षद ब्राह्मणकर, ज्ञानेश्वर गोपाळे, संजय सोनवणे यांनी सहभाग घेतला. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. निमाचे सरचिटणीस उदय खरोटे यांनी सूत्रसंचालन केले. आभार मनीष रावल यांनी मानले. यावेळी मंगेश काठे, एस. के. नायर, उदय रकिबे, संदीप भदाणे, मितेश पाटील, सुनील बाफना यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)