अवास्तव शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांविरोधात कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:54+5:302021-04-09T04:14:54+5:30
नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होत असताना आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय तसेच दुर्बल घटकातील कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांकडून अवास्तव अनामत ...
नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होत असताना आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय तसेच दुर्बल घटकातील कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांकडून अवास्तव अनामत घेऊनच रुग्णावर उपचार करण्याचे प्रकार सुरू असून, यात ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटलचे डिपॉझिट तसेच लॅब, मेडिकल शुल्काची रक्कम अनामत घेऊनच उपचार करण्याचे प्रकार सुरू असल्याला आरोप करीत अशी रुग्णालये, प्रयोगशाळा व तपासणी केंद्रांवर कठोर कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर यांनी केेली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाविषयी दिली जाणारी माहिती अवास्तव असल्याचा आरोप छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला असून, सामान्य रुग्णांची पावलापावलांवर अडवणूक सुरू आहे. याविरोधात आवाज उठविणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे नमूद करीत छावा क्रांतिवीर संघटनेतर्फे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले आहे. अशा प्रकारे रुग्णांची अडवणूक करणाऱ्या रुग्णालयांसह डॉक्टर, एचआरसीटी सेंटरवर कारवाई करावी, अन्यथा छावा क्रांतिवीर सेना रस्त्यावर उतरून अशा प्रकारच्या संधीसाधूंना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही छावा क्रांतिवीर सेनेचे कराण गायकर यांनी केली आहे.