अल्पवयीन मुलीला फूस लावून अजमेरला नेणाऱ्यावर कारवाई करा - किरीट सोमय्या
By अझहर शेख | Published: June 1, 2023 08:17 PM2023-06-01T20:17:23+5:302023-06-01T20:17:38+5:30
निफाड तालुक्यातील एका १८ वर्षीय मुलीला फूस लावून थेट राजस्थानात पळवून नेल्याची घटना घडली होती.
नाशिक : निफाड तालुक्यातील एका १८ वर्षीय मुलीला फूस लावून थेट राजस्थानात पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नाशिक ग्रामिण पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरविल्याने मुलीची सुखरूप सुटका करण्यास यश आले; मात्र अशाप्रकारे अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या भेटीत केली.
किरीट सोमय्या हे गुरुवारी (दि.१) नाशिक दौऱ्यावर आले होते. सकाळी त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कायदासुव्यवस्थेच्या विविवध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी निफाड तालुक्यातील एका मुलगी नुकतीच १८ वर्षे पुर्ण झाली. त्यानंतर गावातीलच २४ वर्षीय विवाहित तरुणाने तिला बळजबरीने काहीतरी आमीष दाखवून पळवून नेले. राजस्थानातील एका धार्मिक स्थळावर घेऊन जात त्याने मुलीला कोणतेतरी तावीज बांधण्याचाही प्रयत्न केल्याचे सोमय्या म्हणाले. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने तपास करून ४८ तांसात मुलीची सुटका केली आणि तिला सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले. दरम्यान हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप सोमय्या यांनी करत याबाबत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरीष पालवे हेदेखील उपस्थित होते.