साठेबाजी करणाऱ्या खतविक्रेत्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:20+5:302021-06-06T04:11:20+5:30
सिन्नर : रासायनिक खतांची साठेबाजी करून काही खत विक्रेते जादा दराने बेकायदेशीर विक्री करत आहेत. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची ...
सिन्नर : रासायनिक खतांची साठेबाजी करून काही खत विक्रेते जादा दराने बेकायदेशीर विक्री करत आहेत. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांना निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील खत दुकानदार बेकायदेशीररीत्या रासायनिक खतांची खासगी जागेत साठेबाजी करत आहेत. असे खत जादा दराने शेतकऱ्यांना विकत आहेत. त्यामुळे अगोदरच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. कोरोनाकाळात बाजारपेठा बंद असल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. आता खतांच्या वाढत्या दरामुळे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यातील खत दुकानदारांनी खतसाठा रजिस्टरची तपासणी करून खासगी जागेत ठेवलेला माल शासनजमा करण्यात यावा, जास्त दराने खत विक्री करणाऱ्या दुकानदाराचा परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख बबन जगताप, अॅड. भाग्यश्री ओझा, एस.एस. लहामगे आदींच्या सह्या आहेत.
कोट...
काही खतविक्रेते बेकायदेशीर रासायनिक खतसाठा करून शेतकऱ्यांना वाढीव किमतीत विक्री करत असल्याचे खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने प्रांताधिकाऱ्याना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. परिसरात कोणी खत विक्रेता वाढीव दर लावून पक्क्या बिलाशिवाय खते विक्री करत असेल, तर तालुक्यातील शेतकरी बांधवांनीही तक्रार करावी.
-बबन जगताप, जिल्हा संपर्कप्रमुख, भूमिपुत्र शेतकरी संघटना