कोट्यवधींच्या घोटाळ्यातील संशयितांवर कारवाई करा
By admin | Published: November 27, 2015 10:56 PM2015-11-27T22:56:12+5:302015-11-27T22:56:36+5:30
गिरीश मोहितेंचे विभागीय सहनिबंधकांना निवेदन
नाशिक : मागील वर्षी झालेल्या जिल्हा परिषदेच्या लेखा परिक्षण व फेर लेखा परिक्षण अहवालानुसार कोट्यावधी रूपयांच घोटाळा असलेल्या संचालकांवर महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० च्या कलम ८३ व ८८ नुसार कारवाई करण्याचा निर्णय झालेला असताना, अठरा महिन्यांपासून त्याबाबत काहीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप जनता दलाचे सचिव डॉ. गिरीश मोहिते यांनी केला आहे.
यासंदर्भात विभागीय सहनिबंधकांना काल (दि. २७) डॉ. गिरीश मोहिते यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या लेखा परीक्षण व फेर लेखा परीक्षणात कलम ८३ व ८८ नुसार जबाबदारी निश्चित झालेल्या संचालकांवर कारवाई करण्याबाबत ४ मार्च २०१४ रोजीच विभागीय सहनिबंधक कार्यालयाने पत्र दिले होते. मात्र त्याबाबत आता संबंधित दोषी संचालकांवर काय, कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती मिळावी. जर कारवाई झालेली नसेल तर संबंधित दोषी संचालकांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी जनता दलाचे (सेक्युलर) राज्य सचिव डॉ. गिरीश मोहिते यांनी केली आहे. विशेष म्हणजे याबाबत माजी संचालक राजेंद्र भोसले यांनी यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात तत्कालीन सहकारमंत्र्यांसह जिल्हा बॅँकेच्या संचालकांना, विभागीय सह निबंधंकांना आणि जिल्हा उपनिबंधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आता डॉ. गिरीश मोहिते यांनी पुन्हा ही मागणी उचलून धरली आहे.(प्रतिनिधी)