मातोरीच्या नाल्यावरील पूल गेला वाहून
By Admin | Published: August 4, 2016 01:45 AM2016-08-04T01:45:53+5:302016-08-04T01:45:53+5:30
मातोरीच्या नाल्यावरील पूल गेला वाहून
मातोरी : मातोरी गावातील पाझर तलावाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने नाल्यास नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गावातील अंगणवाडी समोरील नुकताच बनविलेला पूल पूर्णत: वाहून गेला.
बुधवारी मध्यरात्री पावसाचा जोर ओसरला असून अनेक पाण्याखाली गेलेली पिके सडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी पावसाचा जोर आजही आहे. मुंगसरा रस्त्यावरील शिवाजी सूर्यवंशी यांच्या घराला पाण्याने वेढा दिल्याने त्यांचा संपर्कही तुटला होता. रामगंगा, जांब ओहळ, मातोरखोरा दुथडी भरून वाहत होते.
दोन दिवसांपासून झाडाची पडझड झाल्याने वीजप्रवाह खंडित झाला होता. आता पावसाच्या उघडीपीमुळे प्रवाह सुरळीत करण्याच्या कामाला वेग आला आहे. पावसाने उघडीप दिल्याने तलाठी कटाळे तात्या यांनी वाहून गेलेले रस्ते, खळून गेलेली जमीन, रस्ते यांची पाहणी केली असून या बाबतची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. (वार्ताहर)