लहान मुलांना जपा, डिहायड्रेशनचा धोका; उन्हाळ्यात 'अशी' घ्या चिमुकल्यांची काळजी, 'ही' आहेत लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 02:15 PM2022-04-01T14:15:36+5:302022-04-01T14:16:12+5:30
नाशिक : लहान मुलांना डिहायड्रेशनचा त्रास उन्हाळ्यातच होतो. अतिघाम येण्यापासून अतिसार आणि उलट्या होणे, हे शरीरातील पाणी कमी होण्यास ...
नाशिक : लहान मुलांना डिहायड्रेशनचा त्रास उन्हाळ्यातच होतो. अतिघाम येण्यापासून अतिसार आणि उलट्या होणे, हे शरीरातील पाणी कमी होण्यास कारणीभूत ठरतात; परंतु पालकांनी योग्य दक्षता घेतल्यास या निर्जलीकरणाला वेळीच रोखता येते. मात्र, जर त्याच्या मुख्य लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर बालकांना थेट रुग्णालयात दाखल करण्याचीही वेळ पालकांवर येऊ शकते.
डिहायड्रेशन म्हणजे काय?
डिहायड्रेशन ही अशी स्थिती आहे, जिथे शरीरातील पाणी प्रचंड प्रमाणात कमी होते. शरीरातील कार्यांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची कमतरता निर्माण करते. अखेरीस सामान्य चयापचय प्रक्रियेत व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुलांमध्ये निर्जलीकरण होण्याचा सर्वाधिक धोका असण्यामागे त्यांच्या शरीरात द्रवसाठा कमी असतो. विषाणू, जिवाणू किंवा परजीवी संसर्ग आणि अगदी अन्नातील ॲलर्जीमुळे होणाऱ्या पातळ शौचामुळे ही स्थिती उद्भवू शकते. उलट्या होण्यामुळे तसेच अतिसारामुळे शरीराच्या द्रवसाठा द्रुतगतीने कमी होतो. उच्च उष्णता आणि आर्द्रता यांमुळे जास्त घाम येणे, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघात होऊ शकतो. घराबाहेर प्रदीर्घ काळ खेळणारी लहान मुले डिहायड्रेशनच्या या प्रकारास बळी पडतात.
दीर्घकाळ खेळल्याने होते पाणी कमी
तोंड सतत कोरडे पडणे हे मुलांमध्ये डिहायड्रेशनचे सर्वांत पहिले चिन्ह आहे. कमी लाळ दिसते आणि कोरड्या ओठांमुळे पांढरटपणा दिसतो. बालकांना सहा ते आठ तास लघवी होत नाही किंवा खूप गडद आणि मूत्राचे प्रमाण अत्यल्प असते. दिवसभरात आपल्या शरीरातील पाण्याचा वेगवेगळ्या म्हणजेच घाम, लघवी, शौच आणि अश्रूंच्या स्वरूपांत ऱ्हास होतो. हे शरीरातील कमी झालेले द्रव आणि त्याचे क्षार, घेतलेल्या द्रवपदार्थांद्वारे आणि दिवसभर बालकांनी घेतलेल्या आहारामुळे भरून काढले जाते. त्यामुळे आपल्या शरीरास आवश्यक पातळीइतके हायड्रेट राहण्यास मदत होते. घरात किंवा घराबाहेर दोन्ही ठिकाणी दीर्घकाळ खेळल्यामुळे मुले मोठ्या प्रमाणात द्रव आणि ग्लायकोकॉलेट गमावू शकतात. जर बाळास अस्वस्थ वाटत असेल आणि ताप, अतिसार किंवा उलट्यांचा त्रास असेल तर ते डिहायड्रेशनचे कारण असू शकते. तसेच, काही वेळा तोंड, घशाच्या आजारांमुळे त्यांना पाणी किंवा इतर द्रव पिणे कठीण होऊ शकते आणि त्यामुळेसुद्धा निर्जलीकरण होऊ शकते.