आघाडीत कॉँग्रेस घेईना, राज पत्ते खोलेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:45 AM2019-03-14T00:45:18+5:302019-03-14T00:45:42+5:30

सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात तब्बल २ लाखांहून अधिक मते घेत राष्टÑवादी कॉँग्रेससमोर तगडे आव्हान उभे केलेल्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेला २०१४ च्या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

 Take the Congress in front, open the cards! | आघाडीत कॉँग्रेस घेईना, राज पत्ते खोलेना!

आघाडीत कॉँग्रेस घेईना, राज पत्ते खोलेना!

googlenewsNext

नाशिक : सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात तब्बल २ लाखांहून अधिक मते घेत राष्टÑवादी कॉँग्रेससमोर तगडे आव्हान उभे केलेल्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेला २०१४ च्या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता १७ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली असताना मनसेच्या गोटात मात्र स्मशान शांतता आहे. एकीकडे मनसेला महाआघाडीत घेण्यास कॉँग्रेसने आपली विरोधाची भूमिका कायम ठेवलेली असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मात्र, अद्याप त्यांच्या मनातील डावपेचाचे पत्ते खोलले जात नसल्याने कार्यकर्ते संभ्रमित आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार असेल की नसेल, या विषयी उत्सुकता वाढलेली आहे.
सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातून मनसेचे तीन आमदार निवडून गेले होते. याशिवाय नाशिक महापालिकेत तब्बल ४० जागा जिंकून मनसेने इतरांच्या मदतीने सत्ता हस्तगत केली होती. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात मनसेचे हेमंत गोडसे यांनी २ लाख १६ हजार मते घेऊन राष्टÑवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना कडवी लढत दिली होती.
मात्र, अवघ्या २२ हजार मतांनी गोडसे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, पुलाखालून बरेच पाणी वाहून जात सन २०१४ च्या निवडणुकीत गोडसे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेत राष्टÑवादीचे मातब्बर उमेदवार छगन भुजबळ यांना पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी, मनसेने राज यांचे निकटचे स्नेही डॉ. प्रदीप पवार यांना निवडणुकीत उतरवले होते. परंतु, मोदी लाटेत मनसेचाही पुरता धुव्वा उडाला होता. पवार यांना ६३ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. मनसे त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आता मोदी यांना विरोधासाठी राज्यात कॉँग्रेस-राष्टÑवादीसह महाआघाडी उभी राहत असताना महाआघाडीत मनसेला घेण्यास राष्टÑवादी कॉँग्रेस उत्सुक असून कॉँग्रेसने मात्र जोरदार विरोध दर्शविलेला आहे. एकीकडे मनसे लोकसभेची एकही जागा लढणार नसल्याचे राष्टÑवादीचे नेते जाहीरपणे सांगत असताना मनसेकडून मात्र त्याबाबत स्पष्टता केली जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघात मनसे असणार की नाही, याबाबत काहीही निर्णय होत नसल्याने मनसेकडून कुणा इच्छुकांच्याही नावाची चर्चा होताना दिसून येत नाही. गेल्या दोन वेळच्या निवडणुकीत राष्टÑवादीवर सडकून टीका करणाऱ्या राज ठाकरे यांच्याकडून यंदा राष्टÑवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार काय, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
वर्धापनदिनीही वेट अ‍ॅण्ड वॉचच!
मनसेचा वर्धापनदिन गेल्या ९ मार्चला मुंबईत पार पडला. त्यावेळी, राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीविषयी आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी आपण लोकसभा निवडणुकीबाबत आता काहीही बोलणार नसल्याचे सांगत भूमिकेबाबत संदिग्धता कायम ठेवली. आपण यापुढे खूप काही सांगणार असल्याचे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रतीक्षा कायम ठेवली आहे.

Web Title:  Take the Congress in front, open the cards!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.