घ्या देवीचे दर्शन, मिळवा लसीचे संरक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 01:13 AM2021-10-11T01:13:01+5:302021-10-11T01:13:31+5:30
जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्यात सुरू करण्यात आलेल्या मिशन कवचकुंडल मोहिमेंतर्गत देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांना कोरेाना लसीचे डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वणी आणि चांदवड येथील देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रविवारपासून लस देखील दिली जात आहे. पुढील ७२ तास ही मोहीम सुरू राहाणार असून, जास्तीत जास्त भाविकांना लस देण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.
नाशिक : जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्यात सुरू करण्यात आलेल्या मिशन कवचकुंडल मोहिमेंतर्गत देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांना कोरेाना लसीचे डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वणी आणि चांदवड येथील देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रविवारपासून लस देखील दिली जात आहे. पुढील ७२ तास ही मोहीम सुरू राहाणार असून, जास्तीत जास्त भाविकांना लस देण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.
कोरेानापासून संरक्षण मिळविण्यासाठी लसीकरण हेच सध्या एकमेव प्रभावी माध्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या हेतूने राज्य शासनाकडून मिशन कवचकुंडल सुरू करण्यात आले आहे. रविवारी सुटीच्या दिवशी भाविकांची देवस्थानच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन वणी येथील सप्तशृंगी गड तसेच चांदवड येथील रेणुकादेवी मंदिर येथे या ठिकाणी भाविकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम अखंड सुरू राहणार आहे.
या दोन्ही देवस्थानच्या ठिकाणी जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. कोरेाना नियमांचे पालन करून भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याशिवाय पासची सुविधा असल्याने येणाऱ्या भाविकांची संख्या देखील मर्यादित असली तरी ओघ मात्र कायम आहे. ज्यांचे दोन्ही डोस झालेले नाहीत किंवा ज्यांचा एक डोस राहिलेला आहे, अशा नागरिकांना देवस्थानच्या ठिकाणी लस टोचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
--इन्फो--
भाविकांमध्ये भीती; जनजागृतीचा प्रयत्न
मिशन कवचकुंडल मोहिमेच्या पहिल्या दिवशी भाविकांमध्ये काहीशी साशंकता तसेच भीतीदेखील दिसून आली. त्यामुळे या मोहिमेस कसा प्रतिसाद मिळतो याबाबतची प्रशासनाला चिंता आहे. लस टोचल्यानंतर ताप येत असल्याची भीती भाविकांना आहे. त्यामुळे ते लागलीच लस घेण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे भाविकांचे प्रबोधनही करण्याची वेळ आली आहे. ताप लागलीच येत नाही तर रात्री झोपताना शक्यतो ताप किंवा कणकण येण्याची शक्यता असते. याबाबत जनजागृती केली जात आहे.
--कोट--
सप्तश्रृंगी गडावरील रोप-वे आणि खाली चेक नाक्यावर लसीकरणासाठीचे बूथ लावण्यात आलेले आहेत. भाविकांकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळत नसला तरी त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृतीसाठीचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचा परिणामही दिसून येत असून गडावर जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- डॉ. चिराग पवार, लसीकरण नोडल ऑफिसर,सप्तश्रृंगी गड.