...त्यापेक्षा घरीच डीव्हीडी आणून सिनेमा बघू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:14 AM2018-07-01T01:14:38+5:302018-07-01T01:15:28+5:30
मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये खाद्यपदार्थांचे दर चौपट ते पाचपट महाग आकारले जातात. प्रेक्षकांनी घरून खाण्याची वस्तू, पाणी आदी नेल्यास त्याला बंदी केली जाते. यामुळे सुटीच्या दिवशी कुटुंबासह सिनेमाला गेलेल्या व्यक्तीच्या खिशाला तिकिटाचे दर, खाद्यपदार्थांचा खर्च, येण्या-जाण्याचा खर्च म्हणजे मोठा आर्थिक फटका बसण्यासारखे होत आहे.
नाशिक : मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये खाद्यपदार्थांचे दर चौपट ते पाचपट महाग आकारले जातात. प्रेक्षकांनी घरून खाण्याची वस्तू, पाणी आदी नेल्यास त्याला बंदी केली जाते. यामुळे सुटीच्या दिवशी कुटुंबासह सिनेमाला गेलेल्या व्यक्तीच्या खिशाला तिकिटाचे दर, खाद्यपदार्थांचा खर्च, येण्या-जाण्याचा खर्च म्हणजे मोठा आर्थिक फटका बसण्यासारखे होत आहे. मल्टिप्लेक्सला जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा घरीच डीव्हीडी आणून का पाहू नये? असा सवाल आता प्रेक्षकांकडून केला जात आहे. मल्टिप्लेक्समधील खाद्यविक्रेत्यांची ही दादागिरी थांबविण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा व विक्रेत्यांना तरीही दरवाढ मागे घेण्याची इच्छा नसेल तर प्रेक्षकांना घरून पदार्थ, पाणी देण्याची मुभा द्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे. याबाबत प्रेक्षकांशी साधलेला हा संवाद...
मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे दर अयोग्य आहेत. दर कमी केले पाहिजेत. त्या पदार्थांचे बाहेरचे दर आणि मल्टिप्लेक्समधले दर यात खूपच तफावत दिसून येते, शासनाने यात लक्ष घालावे. सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या सिनेमा बघणे अवघड होऊन बसले आहे. हे दर कमी होणार नसतील तर घरून पदार्थ नेण्याची परवानगी द्यावी.
- संजय शिंदे, हिरावाडी
एखादा सिनेमा बघायला सहकुटुंब जायचे म्हटल्यावर खर्चाचा आकडा पाहता जावे की नाही असा प्रश्न पडतो. तिकिटाचे
दर वेगळे, तिथल्या खाद्यपदार्थांचे दर वेगळे एकूण बजेट कोलमडून जाते. त्यापेक्षा घरीच डीव्हीडी
आणून सिनेमा बघितला तर ते सोयीस्कर पडेल असे आता वाटायला लागले आहे. सिनेमाघरात येणाऱ्या प्रत्येकालाच हे अव्वाच्या सव्वा दर परवडतील असे नाही. शासनाने याचा विचार करावा. - नितीन शेलार, पंचवटी