अभ्यासक्रमात उद्योजकांच्या यशकथा घ्याव्यात : भोगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:36 AM2018-08-26T00:36:34+5:302018-08-26T00:37:05+5:30
आज पदवी, पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमात परदेशांमधील उद्योजकांच्या कथा, त्यांची कार्यपद्धती शिकविली जाते. पण तेथील वातावरण, कायदे, स्थिती आपल्या देशात लागू होत नाही.
नाशिक : आज पदवी, पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमात परदेशांमधील उद्योजकांच्या कथा, त्यांची कार्यपद्धती शिकविली जाते. पण तेथील वातावरण, कायदे, स्थिती आपल्या देशात लागू होत नाही. त्यामुळे आपल्या देशातील यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा आपल्या अभ्यासक्रमात असल्या पाहिजेत. त्यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक रामचंद्र भोगले यांनी केले. चोपडा लॉन्स येथे शनिवारी (दि.२५) पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. दत्ता जोशी लिखित ‘पोलादी माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. ते पुढे म्हणाले, गुन्हेगारांची यादी सर्व पोलीस ठाण्यांना पटकन उपलब्ध होते; पण समाजाच्या चांगल्या लोकांची यादी सहसा कोणाकडे नसते. हे काम या पुस्तकातून सहजतेने झाले आहे.
सुनील गोयल यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना समाजसेवेचे हे व्रत आम्ही हाती घेतले असून, ते प्रामाणिकपणे चालू ठेवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. लेखक दत्ता जोशी यांनी या पुस्तकनिर्मितीसाठी केलेला प्रवास, आलेले अनुभव नमूद केले. याप्रसंगी एम. के. बिरमानी, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, नरेंद्र गोलिया, एम. जे. नंदेशीय, सुनील बनारसीदास, विवेक कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, सी. एल. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
समाजातील आदर्श शोधून या पुस्तकातून सादर केले आहेत. हे अत्यंत अवघड काम जोशी यांनी केले असून, ही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त मार्गदर्शक ठरू शकतात, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.