संभाजीराजे यांच्या संस्कृत भाषा अभ्यासाचा आदर्श घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 06:47 PM2018-09-30T18:47:41+5:302018-09-30T18:48:12+5:30
सलग नऊ वर्षे औरंगजेबाच्या सेनासागराशी झुंज देणारे, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक अशा अनेक संस्कृत ग्रंथांची रचना केली. या साहित्यकार छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान गोदाकाठचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र आबा पाटील यांनी केले.
सिन्नर : सलग नऊ वर्षे औरंगजेबाच्या सेनासागराशी झुंज देणारे, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक अशा अनेक संस्कृत ग्रंथांची रचना केली. या साहित्यकार छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान गोदाकाठचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र आबा पाटील यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग केदार, सरचिटणीस राजाराम आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, प्राचार्य टी. पी. सहाणे, उपप्राचार्य ए. जी. गिते, उपमुख्याध्याक डी. एम. ढगे, बहि:शाल केंद्राचे कार्यवाह प्राध्यापक के. डी. कुलकर्णी, के. डी. घुगे, आर. जी. कुळधरण आदी उपस्थित होते.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या अवघ्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर सलग ९ वर्षे हिंदवी स्वराज्याची भगवी पताका फडकत ठेवली. शेवटच्या क्षणात वतनाने लाचार झालेला संभाजी राजांचा सख्खा मेहुणा गणोजी शिर्के औरंगजेबाला फितूर झाला व छत्रपती संभाजी राजे हाती लागले. पुढे सतत ३९ दिवस हा धर्मयोद्धा मरणाला सामोर जात राहिला व अखेर ११ मार्च १६८९ रोजी या धर्मवीराने देव, देश, धर्म व स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.
इतिहासात अजरामर झालेल्या वीर योद्ध्यांचे बलिदानातून प्रेरणा घेऊन आपणही राष्ट्ररक्षणासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत डॉ. आबा पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.