'दंड घ्या पण परीक्षा नको', हेल्मेट सक्तीच्या मोहिमेत पोलीस आयुक्तांसमोर नागरिकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 11:03 AM2022-01-21T11:03:34+5:302022-01-21T11:04:33+5:30
Nashik : नाशिक शहरात हेल्मेट वापरासाठी सुरुवातीला पोलीस प्रशासनाकडून 'नो हेल्मेट नो पेट्रोल', 'नो हेल्मेट कोऑपरेशन', 'नो हेल्मेट दोन तास समुपदेशन', 'नो हेल्मेट नो एन्ट्री', अशा मोहीम राबविण्यात आल्या.
- किरण ताजणे
नाशिक : एकीकडे राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता राज्य सरकारने जमावबंदीचा आदेश लागू केले आहेत. नाशिक शहरामध्ये देखील त्याचं काटेकोरपणे पालन करावे असे प्रशासनाच्या वतीने आवाहन केले जात आहे. मात्र, पोलीस प्रशासनालाच याचा विसर पडलाय का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्याचे कारण म्हणजे हेल्मेट सक्तीच्या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना एकत्र जमवून परीक्षा घेतली जात आहे.
नाशिक शहरात हेल्मेट वापरासाठी सुरुवातीला पोलीस प्रशासनाकडून 'नो हेल्मेट नो पेट्रोल', 'नो हेल्मेट कोऑपरेशन', 'नो हेल्मेट दोन तास समुपदेशन', 'नो हेल्मेट नो एन्ट्री', अशा मोहीम राबविण्यात आल्या. त्याचा काही अंशी सकारात्मक फरक पडला असला तरी काही अंशी नाशिककरांची नकार घंटाच बघायला मिळाली. त्याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाने थेट हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू केली आहे. याच दरम्यान अनेक दुचाकीस्वार अजूनही हेल्मेट वापरात नसल्याने त्यांच्याकडून दंड आणि परीक्षा घेतली जात आहे.
पोलीस चौकी किंवा पोलीस स्टेशनच्या आवारात त्यामुळे गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच लोकांच्या वर एकत्र येण्यास बंदी असताना याठिकाणी इतकी गर्दी का करताय असे सांगत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक नागरिक तर दंड घ्या पण परीक्षा नको असे म्हणून पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. त्यामुळे हेल्मेट सक्तीच्या मोहिमेत नागरिकांचा संतापही बघायला मिळत आहे. तर या कटकटीपेक्षा हेल्मेट बरे म्हणून हेल्मेट वापरू लागले आहे.
दरम्यान, काल खुटवडनगर पोलीस चौकीत आयुक्त दीपक पांडे यांच्या उपस्थितीत शहर वाहतूक शाखेतर्फे विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून आर्थिक दंड व एकत्रित लेखी परीक्षा घेण्यात आली. या वेळी पोलीस व दुचाकीस्वारांची चांगलीच गर्दी जमली होती. वाद घालणाऱ्या एका मुलाला पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी अतिशय मवाळ भाषेत हेल्मेट तुमच्या कसे फायद्याचे आहे, याची जाणीव करून दिली. यात तब्बल 13 हजार रुपयांचा दंडही वसूल केला. दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळून आल्यास एक हजार रुपयांचा दंड आणि पुढील तीन महिन्यांसाठी परवाना रद्द करण्यात येणार आहे.