मोबाईल न्या, अन्यथा कारवाई होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 01:32 AM2021-12-13T01:32:05+5:302021-12-13T01:33:32+5:30
वारंवार ना दुरूस्त होणारे मोबाईल अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प कार्यालयात जमा केल्याने शासकीय कामकाजात होत असलेला अडथळा लक्षात घेता, सेविकांनी आपले नादुरूस्त मोबाईल परत घेवून ते दुरूस्त करावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास अधिकाऱ्यांनी दिला आहे.
नाशिक : वारंवार ना दुरूस्त होणारे मोबाईल अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प कार्यालयात जमा केल्याने शासकीय कामकाजात होत असलेला अडथळा लक्षात घेता, सेविकांनी आपले नादुरूस्त मोबाईल परत घेवून ते दुरूस्त करावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास अधिकाऱ्यांनी दिला आहे. अंगणवाडी सेविकांना दैनंदिन माहिती ऑनलाईन भरण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्यावतीने मोफत ॲन्ड्राईड मोबाईलचे वाटप करण्यात आले होते. परंतु अवघ्या काही दिवसातच ते नादुरूस्त होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ते दुरूस्त करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पदरमोड करावी लागली. दोन ते तीन हजार रूपये त्यावर खर्च होत. या मोबाईलची डाटा साठवणूक क्षमता कमी असल्यामुळे माहिती भरण्यात अडचण तर येतच होती, मात्र दुर्गम भागात इंटरनेटची सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्याने सेविका मेटाकुटीस आल्या होत्या. त्यातच काही सेविकांना इंग्रजीचे ज्ञान तोडके असल्यामुळे त्यांना माहिती भरण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काहींनी कुटुंबातील व्यक्तींच्या मोबाईलचा आधार घेवून त्यांच्याकडूनच माहिती भरून घेतली. राज्यभराचा हा प्रश्न निर्माण झाल्याने सप्टेंबर महिन्यात राज्य अंगणवाडी कृती समितीने राज्यभर मोबाईल वापसी आंदोलन राबवून, सर्व अंगणवाडी सेविकांनी आपापल्या प्रकल्प कार्यालयात मोबाईल जमा केले होते. नवीन मोबाईल द्या, अशी मागणी करून दैैनंदिन ऑनलाईन माहिती भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. मध्यंतरी या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित मोबाईल कंपनीने ते दुरूस्त करून देण्याची तयारी दर्शविली मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
आता मात्र चार महिन्यांनंतर पुन्हा एकत्मिक बाल विकास सेवा योजन कार्यालयास या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले असून, त्यांनी राज्य भर जमा करण्यात आलेले ४४,२०६ मोबाईल पैकी केवळ १२, ८६४ मोबाईल नादुरूस्त असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दुरूस्त असलेले मोबाईल सेविकांनी परत न्यावेत अन्यथा शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणावरून सेविकांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
चौकट=====
नाशिक जिल्ह्यात ६२७९ अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले असून, त्यापैकी ६१७ नादुरूस्त आहेत. ५६६२ सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. नादुरस्त मोबाईल दुरूस्त करण्यासाठी एक हजार रुपयांच्या आतील खर्च असेल तर ते फोन सेविकांनी तत्काळ दुरूस्त करून घ्यावेत त्यासाठी अंगणवाडींच्या फ्लेक्सी फंडमधून तरतूद करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.