सेवाग्राम एक्स्प्रेसला नांदगावी थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:33+5:302021-01-22T04:13:33+5:30
नांदगाव : येथील रेल्वे स्टेशनवर बुधवार (दि.२१) पासून सेवाग्राम एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली ...
नांदगाव : येथील रेल्वे स्टेशनवर बुधवार (दि.२१) पासून सेवाग्राम एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली असली तरी उर्वरित पाच प्रवासी गाड्यांचे बंद करण्यात आलेले थांबे पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरच्या काळात काही ‘कोविड स्पेशल’ रेल्वे गाड्या सुरू झाल्या. या सर्व गाड्यांच्या नंबरच्या आधी शून्य असा आकडा टाकून बदल केला आहे. या सर्व गाड्यांना नांदगाव स्टेशनवर कोरोना पूर्व काळात थांबे देण्यात आले होते. मात्र कोविड स्पेशल रेल्वे असे नामकरण केलेल्या गाड्यांना थांबे दिले नाहीत. यामुळे नांदगावकरांनी बंद पुकारून आपला रोष व्यक्त केला होता. या बंदची दखल घेऊन खासदार डॉ. भारती पवार यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे किमान ३ ते ४ गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती. मुंबईकडे जाण्यासाठी कुठलीच रेल्वे नसल्याने प्रवाशांना अनंत अडचणी येत आहेत. या अडचणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने सेवाग्रामचा थांबा दिल्याने काही अंशी का होईना नांदगावहून मुंबई व इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची अडचण दूर होणार आहे. टप्प्याटप्प्याने पुढील रेल्वेसुद्धा सुरू करणार असल्याचे आश्वासन रेल्वे महाव्यवस्थापकांनी दिले असल्याची माहिती खा. डॉ. भारती पवारांनी दिली आहे.