विद्युत रोहित्र निकामी झाल्याने टाकेहर्ष आठ दिवसांपासून काळोखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:51 PM2021-04-17T17:51:48+5:302021-04-17T17:56:14+5:30
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकेहर्ष या गावातील विद्युत रोहित्र आठ ते दहा दिवसांपासून निकामी झाल्यामुळे ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकेहर्ष या गावातील विद्युत रोहित्र आठ ते दहा दिवसांपासून निकामी झाल्यामुळे गावात अंधार दाटला असून तब्बल आठ ते दहा दिवसांपासून या गावातील नागरिकांना काळोखात दिवस काढावे लागत आहेत.
याबाबत महावितरण विभागाला कळविले असता अजूनही दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
टाकेहर्ष गावाची अंदाजे ९०० लोकसंख्या असून गावाकरिता महावितरण विभागाकडून ६३ केव्हीचा रोहित्र वापरात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रोहित्र निकामी झाल्याने गावामध्ये वीजपुरवठा खंडित आहे.
महावितरण विभागाला याबाबतची माहिती पुरविली असता तीन ते चार दिवसांत नवीन रोहित्र उपलब्ध होईल. परंतु गावातील वीजजोडणी धारकांनी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून वीजबिल न भरल्यामुळे गावातील अशा लोकांची पूर्वसूचना देऊन वीज जोडणी काढण्यात आली आहे.
दळणाची पंचाईत
विजेअभावी नागरिकांची अवस्था बिकट झाली असून ऐन उष्म्याच्या दिवसांत बत्तीगुल झाल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. फ्रीज, पंखा, मोबाईल आदी विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा उपयोग शोभेच्या वस्तू म्हणूनच होत आहे. तर विजेअभावी पिठाची गिरणी बंद असल्याने दळण दळण्याची मोठी पंचाईत निर्माण झाली आहे. वीजपुरवठा खंडित असल्यामुळे पाणी पुरवठा बंद असून नैसर्गिक स्त्रोताच्या माध्यमातून महिलांना उन्हातान्हात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
टाकेहर्ष येथील रोहित्र निकामी झाल्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर दिला असून तीन ते चार दिवसांत नवीन रोहित्र बसविण्यात येईल. नागरिकांनी थकीत बिले भरून महावितरण विभागाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- किशोर सरनाईक, महावितरण अधिकारी, त्र्यंबकेश्वर.
नागरिकांना थकलेली वीजबिले भरण्यासंबंधी आवाहन करण्यात येत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे बिले भरण्याची कुवत नागरिकांमध्ये नसल्यामुळे बिले थकीत राहिली आहेत.
- धर्मा भस्मे, सरपंच, टाकेहर्ष.