चोरीसाठी नेले आणि मित्राचा गळा आवळून काटा काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:51 AM2019-11-13T00:51:53+5:302019-11-13T00:52:27+5:30
शीर नसलेला एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह इंदिरानगर पोलीस ठाणेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेठेनगरच्या मोकळ्या मैदानातील विहिरीत सोमवारी (दि.११) आढळून आला होता.
इंदिरानगर : शीर नसलेला एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह इंदिरानगर पोलीस ठाणेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेठेनगरच्या मोकळ्या मैदानातील विहिरीत सोमवारी (दि.११) आढळून आला होता. या मृतदेहाची अखेर शरीरावरील पॅन्टवरून मुलाच्या आई-वडिलांनी ओळख पटविली असून, पोलिसांनी मुलाच्या खूनप्रकरणी मयताच्या तिघा जुगारी मित्रांना संशयित गुन्हेगार म्हणून मंगळवारी (दि.१२) ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजीवनगर झोपडपट्टीतून सोळावर्षीय मुलगा रामेश्वर मनोहर कावले हा दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याचा भाऊ विकास मनोहर कावले (२३) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, सोमवारी येथील विक्रम पेठे यांच्या मळ्यातील एका विहिरीत अनोळखी मुलाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले. शीर नसल्यामुळे ओळख पटविणे अवघड झाले होते. पोलिसांनी कौशल्याचा वापर करत तातडीने तपासाला गती दिली. मृतदेहाच्या अंगावरील पॅन्ट, कमरेचा पट्टा यावरून राजीवनगर भागात विचारपूस सुरू केली. यावरून मयत व्यक्ती हा बेपत्ता झाालेला रामेश्वर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या भावाद्वारे मृतदेहाची ओळख पटविण्यास यश मिळविले. याप्रकरणी रामेश्वरच्या अल्पवयीन तिघा चोर मित्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, आबा पाटील, दत्तात्रय पाळदे, अखलाख शेख, संदीप लांडे, रियाज शेख, जावेद खान आदींनी सहभाग घेत अवघ्या बारा तासांत गुन्हे शोध पथकाने छडा लावला.
जुगारात हरलेल्या
दीड लाखामुळे हत्या
रामेश्वर हा संशयित तिघा मित्रांकडून जुगारात दीड लाख रुपये जिंकला होता. त्यांच्याकडून त्याला रक्कम घेणे बाकी होते, म्हणून तो सातत्याने त्यांच्यावर दबाव वाढवित होता. त्याच्या दबावाला कंटाळून २० सप्टेंबर २०१९ रोजी त्याला मध्यरात्री तिघांनी घराबाहेर काढून ठार मारल्याचे उघडकीस आले आहे.
मित्रांनीच केला विश्वासघात
भंगार चोरीसाठी संशयित तिघे मित्र रामेश्वरला मध्यरात्री घरातून घेऊन गेल्याचे पोलिसांनी सांगितले. चौघे रेशिंग मैदानावर चोरीसाठी आले असता तेथील वॉचमनने त्यांना बघितले. त्यामुळे चौघेही गवताच्या आडोशाला लपले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या तिघा मित्रांनी रामेश्वरचा खून करण्याचा कट तत्काळ रचला. सोबत असलेल्या नायलॉनच्या दोरीने गवतामध्येच त्याचा गळा तिघांनी आवळला आणि दोरीला मोठा दगड बांधून विहिरीत रामेश्वरचा मृतदेह फेकून दिल्याची कबुली तिघांनी दिली.