लग्नसराईचा फायदा घेत महिनाभरात २५ दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:42 PM2019-05-04T15:42:15+5:302019-05-04T15:44:46+5:30
पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण मागील महिन्यात अधिक राहिले. सरासरी दिवसाकाठी एक याप्रमाणे महिनाभरात २५ दुचाकी चोरट्यांनी पळविल्याची नोंद पोलिसांकडे आहेत. सर्वाधिक अर्धा डझन दुचाकी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी लांबविल्या.
नाशिक : लग्नसराईच्या काळात नाशिककरांच्या दुचाकींवर चोरट्यांनी चांगलाच डल्ला मारला. एप्रिल महिन्यात तब्बल २५ दुचाकी शहर व परिसरातून चोरट्यांनी पळविल्या. तसेच अर्धा डझन घरे फोडून दागिन्यांसह रोख रक्कमही लंपास केली. मागील महिन्यात विवाहसोहळे मोठ्या संख्येने शहरासह उपनगरांमध्ये पार पडले. याचा फायदा घेत चोरट्यांनी विविध मंगल कार्यालये, लॉन्सच्या आवारातील वाहनतळांमधून दुचाकी पळवून नेल्या आहे.
शहर परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून विविध प्रयत्न केले जात आहे. कोम्बींग आॅपरेशन, मिशन आॅल आऊट, नाकाबंदी यांसारख्या मोहिमा त्याचाच एक भाग आहे; मात्र पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण मागील महिन्यात अधिक राहिले. सरासरी दिवसाकाठी एक याप्रमाणे महिनाभरात २५ दुचाकी चोरट्यांनी पळविल्याची नोंद पोलिसांकडे आहेत. सर्वाधिक अर्धा डझन दुचाकी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी लांबविल्या. तसेच याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरात तीनवेळा खूनाचा प्रयत्न झाल्याच्या घटनाही घडल्या असून दोन महिलांचा विनयभंग तर एक बलात्काराचाही गुन्हा पोलीस ठाण्याच्या दप्तरी आहे. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतून चार दुचाकी चोरी झाल्या. तसेच एका महिलेचा बलात्कारदेखील झाल्याची नोंद या पोलीस ठाण्यात आहेत. शहरातील आडगाव, देवळाली कॅम्प, नाशिकरोड, भद्रकाली, अंबड, उपनगर अशा प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलेचा विनयभंग झाल्याच्या तक्रारी मागील महिन्यात दाखल आहेत. तब्बल दहा महिलांचा संशयितांनी विनयभंग केला. मागील महिन्यात आदर्श आचारसंहिता सुरू असताना शहरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत होत्या हे विशेष! निवडणूक काळात कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था धोक्यात आली नाही व मतदानप्रक्रियादेखील सुरळीत शांततेत पार पडली असली तरी मागील महिन्यात दुचाकी चोरी, घरफोडी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, विनयभंग, बलात्कारसारखे गुन्ह्यांचे प्रमाण अधिक राहिल्याचे पोलीस ठाण्यांच्या दप्तरी असलेल्या आकड्यांवरून स्पष्ट होते.