तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:46 AM2018-08-28T01:46:52+5:302018-08-28T01:47:09+5:30
लोकप्रतिनिधींना मिळणारी अवमानास्पद वागणूक, परस्पर करवाढ आणि अनेक अन्य अनेक कारणांवरून महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात असलेली खदखद करवाढविरोधी महासभेत बाहेर पडली होती.
नाशिक : लोकप्रतिनिधींना मिळणारी अवमानास्पद वागणूक, परस्पर करवाढ आणि अनेक अन्य अनेक कारणांवरून महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात असलेली खदखद करवाढविरोधी महासभेत बाहेर पडली होती. मात्र त्यानंतरही मुंढे यांच्या कार्यपद्धतीत बदल न झाल्याचा ठपका ठेवत आता महासभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांनी तयार केलेले पत्र सोमवारी (दि. २७) स्थायी समितीला सादर करण्यात आले आहे. येत्या ३१ आॅगस्टच्या आत विशेष महासभेची मागणी त्यात करण्यात आली होती तथापि, महापौरांनी येत्या शनिवारी (दि.१) विशेष महासभा बोलावली असून, मुंडे यांच्या कारकिर्दीचा फैसला येत्या शनिवारी होणार आहे. दिनकर पाटील यांच्या शीर्षपत्रावर नगरसचिवांना सोमवारी (दि.२७) देण्यात आलेल्या पत्रात तुकाराम मुंडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले असून असून विशेष महासभेची मागणी केली आहे.
पदाधिकारी आणि सदस्यांचा अवमान करणे, महासभा व स्थायी समितीच्या अधिकारावर गदा आणणे, नागरी सुविधांबाबत अकार्यक्षमता, हेकेखोर, मनमानी व हुकूमशाही पद्धतीने काम करणे, स्थायी समितीस गैरहजर राहणे आणि करवाढ सरकट रद्द करण्याचा महासभेचा ठराव असतानाही त्याची दखल न घेणे असे आरोप करण्यात आले आहेत.