रोकड काढून घेत ७० किलो वजनाची दानपेटी फेकली गोदापात्रात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:21 AM2021-08-17T04:21:59+5:302021-08-17T04:21:59+5:30
काट्या मारुती पोलीस चौकीपासून मंदिरातील दानपेटी चोरी झाल्याबद्दल महंत भक्तिचरणदास यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली ...
काट्या मारुती पोलीस चौकीपासून मंदिरातील दानपेटी चोरी झाल्याबद्दल महंत भक्तिचरणदास यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. जुना आडगाव नाका येथे पंचमुखी हनुमान मंदिर असून, मूर्तीसमोर झेन इंडस्ट्रीज कंपनीची २५ हजार रुपये किमतीची लोखंडी दानपेटी बसवलेली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दानपेटीसह त्यातील रक्कम चोरून नेली.
चोरट्यांनी मंदिरात सुरू असलेल्या बांधकामाचा फायदा घेऊन प्रवेश करत थेट मंदिरातील दानपेटी लांबविल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या आठवड्यातच पंचवटी कारंजा पोलीस चौकीसमोर फळ घेण्यासाठी आलेल्या एका इसमाच्या दुचाकीच्या डिक्कीतून भरदिवसा दीड लाख रुपये रोकड चोरीला गेली होती, त्यानंतर आता पुन्हा पोलीस चौकीपासून शंभर मीटर असलेल्या मंदिरातून दानपेटी चोरट्यांनी चोरून नेल्याने पंचवटी कारंजा तसेच काट्या मारुती पोलीस चौकीत नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याचे मावळते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरविली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीवरून चार संशयित आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली देत घटनाक्रम सांगितला. गोदापात्रातून दानपेटी तसेच चोरट्यांच्या अंगझडतीतून २७ हजारांची रोकड हस्तगत केली असून, संशयित राज श्रावण बोडके (२०), राहुल राजन सहाणे (२१), नीलेश श्रीपाद उफाळे (१८), गणेश सुरेश काळे (२२) या चौघांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मोतीलाल पाटील करीत आहेत.
160821\16nsk_100_16082021_13.jpg
पंचवटी पाेलीस